मुंबई : सागरी किनारा मार्गातील भुयारात शुक्रवारी सायंकाळी साचलेल्या पाण्यामुळे वाहन घसरून अपघात झाला. अपघातात वाहन उलटले, मात्र सुदैवाने चालक बचावला. या घटनेमुळे सागरी किनारा मार्गातील वाहनांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोल्हापूर येथे अन्न निरीक्षक म्हणून काम करणारे आकाश सोनावणे शुक्रवारी सायंकाळी हाजी अली येथून सागरी महामार्गावरून मरिन ड्राईव्हच्या दिशेने निघाले होते. पावसामुळे सागरी महामार्गाच्या भुयारात पाणी साचले होते. सोनावणे यांना साचलेल्या पाण्याचे छोटे डबके दिसले. त्यांनी अचानक ब्रेक दाबून वाहनाचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला.

मात्र साचलेल्या पाण्यामुळे त्यांचे वाहन घसरले आणि भिंतीवर आदळले. या अपघातामधून सोनावणे सुखरूप बचावले. वाहतूक पोलिसांनी तात्काळ अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल झाली.

दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूलापासून वांद्रे वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत १०.५८ किलोमीटर लांबीचा सागरी किनारा मार्ग आहे. या मार्गावरील बोगद्याची लांबी सुमारे ३ किलोमीटर एवढी आहे.