मुंबई: मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातून वारसा, अधिवास तसेच उत्पन्न प्रमाणपत्रे बेकायदेशीररीत्या जारी झाल्याच्या प्रकरणात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या आदेशानंतर मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे आणि महसूल अधिकारी नागनाथ लोलेवार यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

प्राथमिक तपासात अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून ‘आपले सरकार’ पोर्टल आणि सेतू केंद्रांच्या माध्यमातून एका महिन्यात हजारो प्रमाणपत्रे जारी करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रमाणपत्रांमध्ये वारसा, अधिवास आणि उत्पन्न प्रमाणपत्रांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत महसूल विभागाने विशेष तपास पथक नियुक्त केले आहे. संशयित प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू असून मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासादरम्यान अनेक प्रमाणपत्रे संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महसूलमंत्र्यांनी संबंधितांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

या गैरव्यवहारामागे केवळ काही अधिकारी आहेत की दलालांचे संघटित रॅकेट कार्यरत आहे, याचाही तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, बेकायदेशीररीत्या जारी करण्यात आलेली प्रमाणपत्रे रद्द करण्याबाबतही प्रशासन स्तरावर विचार सुरू असून या प्रकरणामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.