मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून प्रदूषणाच्या समस्येवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुंबईसाठी काँग्रेसने प्रदूषणमुक्तीचा जाहीरनामा तयार केला असून प्रदूषणसाठी सरकारला जबाबदार धरण्यात आले आहे. मुंबईची हवा दिवसेंदिवस प्रदूषित होत चालली असून सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास मुंबईकरांचा प्रदूषणमुक्त हवेत मोकळा श्वास घेता येईल असा दावा जाहीरनाम्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
मुंबईतील प्रदुषण अत्यंत वाईट पातळीवर गेले असून श्वसनाचे आजार वाढत आहेत. मुंबई करांना स्वच्छ हवाही मिळत नाही. मुंबईची हवा विषारी होणे हा निसर्गाचा दोष नाही तर भ्रष्ट, बेजबाबदार आणि संधीसाधू सरकारचे दुर्लक्ष, निष्काळजीपणा आणि प्रयत्नांच्या अभावाचा परिणाम असल्याचा आरोप काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.
वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितत मुंबई प्रदूषणमुक्तीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यु. बी. व्यंकटेश, आमदार अस्लम शेख, प्रवक्ते सचिव सचिन सावंत, आमदार अमिन पटेल, डाॅ. ज्योती गायकवाड, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष माजी आमदार मधु चव्हाण, उपाध्यक्ष प्रणिल नायर, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस आदी उपस्थित होते.
मुंबईत रस्त्याचे क्राँकीटीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. बांधकामं मोठ्या प्रमाणात वाढली आहेत तर दुसरीकडे झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येत आहे. अतिप्रदुषित शहरांच्या श्रेणीत मुंबईचा नंबर लागतो. मुंबईमध्ये वाढणारे प्रदूषण हे ठेकेदार व बांधकामदार, निष्क्रिय आणि जनतेच्या वेदनांबद्दल उदासीन असलेल्या सरकारचे अपयश आहे. महायुती सरकारने मुंबईच्या हवेत विष कालवले असून मुंबईकरांचे जीवन आणि शहराचे भविष्य धोक्यात आणत आहे. मुंबई काँग्रेस मुंबईकरांच्या स्वच्छ हवेच्या मूलभूत अधिकारासाठी लढणार असल्याचे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
मुंबई प्रदूषण मुक्तीचा जाहीरनामा
स्वच्छ हवा हा मुंबईकरांचा मूलभूत हक्क
- हवेच्या गुणवत्तेच्या निरीक्षणासाठी पायाभूत सुविधा उभाणार. वायूप्रदूषणावर २४ तास लक्ष ठेण्याची यंत्रणा उभारणार
- पालिकेच्या धोरणात “स्वच्छ हवा हा प्रत्येक मुंबईकराचा मूलभूत हक्क” अशी औपचारिक तरतूद केली जाईल.
- आरोग्यदायी हवा देणे ही मुंबई महानगरपालिकेची पहिली आणि सर्वोच्च जबाबदारी असेल.
- मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४० ते ६० या सुरक्षित पातळीवर आणणार
- प्रत्येक वॉर्ड, चौक, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशनवर हवा गुणवत्ता निर्देशांक फलक.
- मुंबईकरांना तासागणिक हवा गुणवत्ता निर्देशांकाची माहिती मोबाईलवर उपलब्ध करणार
बांधकाम प्रदूषणावर कठोर नियंत्रण
- बांधकाम आणि सार्वजनिक प्रकल्पांसाठी कठोर प्रदूषण नियंत्रण मानक तयार करून त्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल.
- प्रत्येक बांधकाम प्रकल्पावर पाणी फवारणी यंत्र, हिरव्या जाळ्या, धूळ विरोधी प्रणाली अनिवार्य करणार.
- नियमभंग करणाऱ्यांवर कडक दंड.
- नियम मोडणाऱ्या बिल्डर्सची सार्वजनिक यादी.
- झाकण नसलेल्या डम्पर/डेब्रिस ट्रक संपूर्ण बंदी.
- प्रदूषणाचे नियम तोडणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करणार.
- मोकळ्या जागांवरील बांधकामं त्वरित थांबवणार
- कोळसा–लाकूड वापरणाऱ्या हॉटेल्सना LPG किंवा इलेक्ट्रिकवर स्थलांतराचे निर्देश.
- स्मशानभूमींतील धूर नियंत्रित करून इलेक्ट्रिक स्मशानभूमींना प्रोत्साहन.
- वाहतूक धोरणात व्यापक सुधारणा.
- पीयूसी न केलेल्या वाहनमालकांवर कठोर कारवाई
- बेस्ट इलेक्ट्रिक बसचा मोठ्या प्रमाणात विस्तार; सर्व डिझेल बसेसवर एअर-फिल्टर्स अनिवार्य.
- शाळांमध्ये हवा शुद्धीकरण यंत्र
- पुढील पाच वर्षांत १० लाख झाडांची लागवड.
- मोठ्या बांधकाम क्लस्टर्सभोवती झाडे लावणे अनिवार्य.
- किनारी हिरवाई, आरे जंगलाचे संपूर्ण संरक्षण.
