मुंबई: मुंबई आणि महाराष्ट्रातील हवामान, धार्मिक सण-उत्सव व इतर स्थानिक परिस्थिती यांचा योग्य विचार करूनच मतदारयाद्यांच्या सखोल विशेष फेरतपासणीची मोहीम राबवली जावी. पुनर्विकास प्रकल्पांमुळे इतर भागांत स्थलांतरित झालेल्या नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, फॉर्म ७ चा दुरुपयोग थांबवून प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करावे, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन केली.

संविधानाने १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, हा अधिकार हिरावला जाणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. मुंबईत मॅपिंगचे काम खूप कमी प्रमाणात झालेले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. लोकप्रतिनिधींशी बैठक घेतली पाहिजे. पुनर्वसन व स्थलांतरीत लोकांची नावे वगळली जाणार नाहीत याकडे लक्ष दिले पाहिजे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर दुसरीकडे आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरपुरला पायी चालत जातात, त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार नाहीत, याकडे लक्ष देण्यात यावे, अशी मागणी केल्याचे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले. या शिष्टमंडळात माजी मंत्री नसीम खान, आमदार अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, आमदार भाई जगताप, चरणसिंग सप्रा, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस आदींचा समावेश होता.

नाव वगळण्यापूर्वी ७ दिवसांची नोटीस द्या

महाराष्ट्रात पुढील तीन वर्षांत कोणतीही मोठी निवडणूक नसल्याने फेरतपासणीची ही प्रक्रिया घाईगडबडीत न राबवता पुरेसा वेळ देऊन पार पाडावी. कोणत्याही नागरिकाचे नाव मतदार यादीतून वगळण्यापूर्वी किमान ७ दिवसांची लेखी नोटीस देऊन त्याला आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी. प्रत्येक मतदान केंद्रावर सर्व राजकीय पक्षांच्या अधिकृत प्रतिनिधींना सहभागी करून पारदर्शकता सुनिश्चित करावी. निष्कासित इमारती, चाळी आणि झोपडपट्ट्यांमधून स्थलांतरित झालेल्या नागरिकांचे मतदानाचे अधिकार अबाधित राहण्यासाठी विशेष व्यवस्था करावी. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे बोगस नावे समाविष्ट केल्याच्या तक्रारींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. पावसाळ्याचा विचार करून एसआयआर मोहिमेच्या वेळापत्रकाचा पुनर्विचार करावा अशी मागणी करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. .