काँग्रेस पक्षाच्या शिवाजी पार्क येथे २८ डिसेंबरला होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी देण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत या मागणीसाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार होती मात्र त्याआधीच मुंबई काँग्रेसतर्फे केलेली याचिका मागे घेतली आहे. सुनावणीला येण्यापूर्वीच याचिका मागे घेत असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे आता मुंबईत होणाऱ्या सभेवर प्रश्नचिन्ह निर्माण उभे राहिले आहे. तसेच कोणत्याही कारणाशिवाय ही याचिका मागे घेण्यात आली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी या सभेला मार्गदर्शन करणार होत्या. शिवाजी पार्क येथील जाहीर सभेच्या परवानगीसाठी ऑक्टोबर महिन्यात काँग्रेसतर्फे राज्य सरकारला अर्ज करण्यात आला होता. पण पक्षाच्या अर्जावर राज्य सरकारतर्फे अद्यापपर्यंत निर्णय घेण्यात आलेला नाही, असे जगताप यांनी याचिकेत म्हटले होते.

जगताप यांनी याचिकेते, पक्षाच्या १३७व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्कवर २८ डिसेंबरला जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी राज्य सरकारकडे अर्ज करून २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत शिवाजी पार्क वापरू देण्याची तसेच सभेसाठी तात्पुरते व्यासपीठ बांधण्याची परवानगी मागितली होती. आरोग्य विभाग आणि संबंधित यंत्रणेने घालून दिलेल्या सगळ्या नियमांचे पालन करून ही जाहीर सभा घेण्यात येईल, असा दावाही याचिकेत करण्यात आला होता.

दरम्यान, उच्च न्यायालयाने २०१० मध्ये शिवाजी पार्क शांतता क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. मात्र वर्षातील काही दिवस शिवाजी पार्कवर कार्यक्रमांना परवानगी देण्याची राज्य सरकार आणि पालिकेला मुभा आहे, त्याच नियमाअंतर्गत मुंबई काँग्रेसने शिवाजी पार्कवर पक्षाची जाहीर सभा घेण्यास परवानगी मागितली आहे.