मुंबई : भारतीय हवामान विभागाने मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला असून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सलग दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून मंगळवारी दुपारी २ पूर्वी ३६ तास आधी मुंबई आणि उपनगरांत २०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली. मुंबईत बुधवारी सकाळपासून असाच पाऊस पडत आहे. परिणामी, सकाळपासूनच सखलभागात जलमय होण्यास सुरुवात झाली.

मुंबईसह अनेक ठिकाणी सोमवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास मंदावलेल्या पावसाने सकाळी पुन्हा जोर धरला आणि मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडविली. सखलभाग जलमय झाल्याने रस्ते मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली, तर रेल्वेचाही वेग मंदावला. मुंबईत बुधवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. शीवमधील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून पाणी साचले आहे. पाऊस विश्रांती घेत नसल्याने पाण्याचा निचरा होण्यात अडचणी येत आहेत.

बुधवारी सकाळी ८.३० जेपर्यंत (मागील २४ तासांत) सातांक्रूझमध्ये तब्बल १९३.६ मि.मी. पावसाची, तर कुलाब्यात ८४ मि.मी., मुंबई विमानतळ ७८.५ मि.मी., जुहू विमानतळ ६५.५ मि.मी., विद्याविहार ७० मि.मी., शीव ४९ मि.मी., चेंबूर १०२ मि.मी., भायखळा ९४ मि.मी., सीएसएमटी ५३.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. १ जूनपासून ६ जुलैपर्यंत सांताक्रूझमध्ये एकूण ९२६.१ मि.मी., तर कुलाब्यात एकूण ८४२.६ मि.मी. पावसाची नोंद झाली.