मुंबईतलं दादर स्टेशन म्हणजे मिनिटागणिक गर्दी वाढत जाणारं अत्यंत वर्दळीचं स्टेशन. बाहेर राज्यातून येणाऱ्या गाड्या, राज्यातून येणाऱ्या गाड्या, लोकल ट्रेन्स या सगळ्यांची गर्दी दादरमध्ये होते. दादर स्टेशन, मुंबई सेंट्रल स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन या ठिकाणी अशीच गर्दी असते. इतकंच नाही तर दादर स्टेशनवर मोबाईल, पाकिट हरवल्याच्या घटनाही घडतात. मात्र इथेच काम करणाऱ्या एका हमालाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांचा दीड लाख रूपये किंमतीचा मोबाईल एका हमालाने परत केला आहे. ज्यानंतर या हमालाच्या प्रामाणिकपणाचं कौतुक होतं आहे.
नेमकी काय घडली घटना?
बिग बी अमिताभ बच्चन यांचे मेकअप आर्टीस्ट म्हणून दीपक सावंत गेली अनेक वर्षे काम करतात. दादर रेल्वे स्थानकावर दीपक सावंत गेले होते. त्यावेळी ते स्वतःचा सॅमसंग कंपनीचा दीड लाखांचा मोबाईल विसरले. हा मोबाईल दशरथ दौंड हा दादर स्टेशनवर काम करणाऱ्या हमालाला सापडला. सापडलेला हा मोबाईल या हमालाने तातडीने पोलीस ठाण्यात जमा केला आणि ज्यांचा असेल त्यांना परत करा ही विनंतीही केली. मोबाईल हरवल्याने दीपक सावंत चिंतेत होते. त्यांना हा मोबाईल मिळाल्याचं कळताच ते दादर स्टेशनला आले. त्यांनी पोलिसांची भेट घेतली आणि हमाल दशरथ दौंड यांचं कौतुकही केलं. तसंच योग्य बक्षीस देऊन दीपक सावंत यांनी या हमालाच्या प्रामाणिकपणाचा सन्मानही केला.
पोलिसांनी हमालाचं कौतुक केलं आहे
हमालाने केलेल्या कामाचं सगळीकडं कौतुक होत आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी सुध्दा त्या हमालाचं कौतुक केलं आहे. इतका महागडा मोबाईल दिल्यामुळे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत हे सुध्दा खुष झाले आहेत. त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी त्यांचं कौतुक करुन त्यांना बक्षिस दिलं आहे. रोज असंख्य मोबाईल चोरीच्या घटना घडत असतात. परंतु त्यापैकी क्वचित मोबाईल परत मिळतात.