पावसाळ्यात पोलिसांसारखा रेनकोट घालून, हातात फायबरची काठी घेऊन विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या एका ३६ वर्षीय तोतया पोलिसाला अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंधेरी पूर्व येथील महाकाली जंक्शन परिसरात हा प्रकार घडला. तक्रारदार मनोज ताकमोगे हे त्या परिसरातून दुचाकीवरून जात होते. त्यांच्यासोबत त्यांचे काका सुनील ताकमोगेही होते. महाकाली जंक्शनजवळील कनोसा जंक्शन येथे पोहोचताच पोलिसांसारखा रेनकोट घालून उभ्या असलेल्या एका व्यक्तींने त्यांना रोखले. त्याच्या हातात फायबरची काठीही होती. आरोपीने तक्रारदारांना विनाहेल्मेट दुचाकीवरून प्रवास केल्याप्रकरणी दंड भरण्यास सांगितले. अन्यथा दोनशे रुपये देऊन प्रकरण मिटवण्यास सांगितले. त्या व्यक्तीच्या हालचालींवरून ताकमोगे यांना संशय आल्यामुळे त्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पोलिसांना बोलावले.

त्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोलीस पोहोचले व त्यांनी तोतया पोलिसाला ताब्यात घेतले. चौकशीत तोतया पोलिसाचे नाव विजय दुडगच असल्याचे स्पष्ट झाले. तो वडाळा पूर्व येथील कोकरी आगार येथील रहिवासी आहे. आरोपी पावसाळ्यात पोलिसांसारखा रेनकोट घालून हातात फायबरची काठी घेऊन कमी रहदारी असलेल्या ठिकाणी उभा रहायचा व वाहन चालकांकडून पैसे उकळायचा. ताकमोगे यांच्याकडूनही आरोपीने दोनशे रुपये घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून विजयला अटक केली.