मुंबईत करोना बाधितांचे प्रमाण दोन टक्क्यांखाली

शैलजा तिवले, प्रतिनिधी

मुंबई : आठवडाभरात मुंबईतील रुग्णसंख्येत २६ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच बाधितांचे प्रमाणही दोन टक्क्यांच्या खाली गेले आहे. परंतु मृतांच्या संख्येत मात्र फारशी घट झालेली नाही.

मुंबईत दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होण्यास जूनपासून सुरुवात झाली तरी जून महिन्यात प्रतिदिन रुग्णसंख्या ६०० ते ८००च्या दरम्यानच राहिली. या महिन्यात रुग्णसंख्येचा आलेख स्थिरच राहिला. जूनच्या शेवटच्या आठवडय़ापासून यात थोडी घट व्हायला सुरुवात झाली. मात्र १५ जुलैपर्यंत प्रतिदिन रुग्णसंख्या ही ५०० च्यावरच राहिली. परंतु आता गेल्या आठवडय़ाभरापासून प्रतिदिन रुग्णसंख्येचा आलेख ५०० च्याखाली आला आहे.

रुग्णसंख्येतील घट

११ ते १७ जुलै या आठवडय़ात शहरात प्रतिदिन सरासरी ५०९ रुग्ण आढळले, तर एकूण ३५६६ रुग्णांची नव्याने भर पडली. या काळात बाधितांचे प्रमाण १.५३ टक्के होते. गेल्या आठवडय़ात म्हणजे १८ ते २४ जुलै दरम्यान प्रतिदिन रुग्णसंख्येत घट होऊन सरासरी ४०३ रुग्ण, तर एकूण २८२१ रुग्ण आढळले आहेत. बाधितांचे प्रमाण १.४१ झाले आहे. सध्या मुंबईत ५३९७ रुग्ण उपचाराधीन आहेत.

चाचण्यांची संख्या ३० हजारांखाली

मुंबईत प्रतिदिन केल्या जाणाऱ्या चाचण्यांच्या संख्येतही आठवडाभरात १६ टक्क्यांनी घट झाली आहे. ११ ते १७ जुलै दरम्यान शहरात सरासरी ३२ हजार ६०० चाचण्या केल्या गेल्या. परंतु १८ ते २४ जुलै या काळात यात घट होऊन सरासरी चाचण्यांची संख्या २८ हजार ४३९ झाली आहे.

मुंबईतील आणखी २९९ बाधित, आठ जणांचा मृत्यू

मुंबईमधील रुग्ण दुपटीचा कालावधी १३२४ दिवसांवर पोहोचला असून करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९७ टक्के झाले आहे. सोमवारी आणखी २९९ जण बाधित झाले असून आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले ५०१ रुग्ण सोमवारी करोनामुक्त झाले. तर ५३९७ उपचाराधीन रुग्ण आहेत. रविवारी २४ हजार ९८९ चाचण्या करण्यात आल्या. ठाणे जिल्ह्य़ात ३०५ नवे रुग्ण आढळून आले. तर ११ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्य़ातील ३०५ करोना रुग्णांपैकी कल्याण-डोंबिवली १०२, नवी मुंबई ५८, ठाणे ५३, मीरा-भाईंदर ३७, ठाणे ग्रामीण २१, अंबरनाथ १६, बदलापूर ९, उल्हासनगर ७ व भिवंडीत दोन रुग्ण आढळून आले.

मृतांच्या संख्येतील घट नगण्य

बाधितांचे प्रमाण कमी झाले असले तरी मृतांच्या संख्येत मात्र फारशी घट झालेली नाही. ११ ते १७ जुलै या आठवडय़ात एकूण ७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १८ ते २४ जुलै या आठवडय़ात ७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत संसर्गाचे प्रमाण कमी झाले असून बाधितांचे प्रमाणही कमी झाले आहे. मृतांची संख्या पुढील आठवडय़ात कमी होण्याची शक्यता आहे. दुसरी लाट ओसरायला बराच कालावधी लागला असला तरी आता रुग्णसंख्या कमी होत आहे, हे आशादायक चित्र आहे,

– डॉ. राहुल पंडित, करोना कृती  दलाचे सदस्य

ठाणे जिल्ह्य़ात आजही लसीकरण 

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात अतिवृष्टी आणि लससाठय़ाच्या तुटवडय़ामुळे गेल्या आठवडय़ाभरापासून बंद असलेले लसीकरण केंद्रे सोमवारी सुरू झाले. त्यामुळे नागरिकांनी मोठय़ा संख्येने लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती. मंगळवारीही जिल्ह्य़ातील काही लसीकरण केंद्रे सुरू राहणार असल्याची माहिती महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.

ठाणे शहरात एकूण ४२ केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे. मंगळवारी या महापालिका क्षेत्रात २१ केंद्रे सुरू राहणार असून या केंद्रांवर केवळ दुसरी मात्रा देण्यात येणार आहे. तर भिवंडी शहरातही पाच पैकी दोन, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे ग्रामीण भागातही लसीकरण केंद्रे सुरू राहणार आहेत.