करोना साथ आटोक्यात आल्यानं मुंबईतील जनजीवनानं पुन्हा गती घेतली होती. मात्र, पुन्हा एकदा करोनामुळे ब्रेक लागण्याची भीती दिसू लागली आहे. फेब्रुवारीपासून मुंबईत करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर वाढला असून, आता सरासरी ०.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. तसेच परिस्थिती बिघडली तर मुंबईत पुन्हा लॉकडाउन करण्याचे संकेत दिले आहेत.

मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर इमारतींमध्ये करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. घरातील एक व्यक्ती बाधित झाल्यानंतर कुटुंबातील सर्वांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. चाचण्यांच्या अहवालात कुटुंबातील अन्य सदस्यही बाधित असल्याचे आढळून येत आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर डिसेंबरनंतर घसरला होता. तो ०.१२ टक्क्यांवर स्थिर झाला होता. मात्र हा दर वाढून आता सरासरी ०.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर काळजीची बाब म्हणजे मुंबईतील काही विभागांमध्ये हा दर ०.३० टक्क्यांच्याही पुढे आहे. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे.

मुंबईतील करोना परिस्थितीविषयी बोलताना पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले,”रुग्णसंख्या वाढत आहेत, हे मान्य करावं लागेल. आवाहन करूनही लोक ऐकत नाहीयेत. आता आम्ही कारवाईही सुरू केली आहे. लग्नासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी घेतली जाते. पण, प्रत्यक्षात ३०० ते ४०० लोकांना बोलवतात. अशा लोकांवर कारवाई सुरू केली आहे. नाईट क्लबवरही कारवाई सुरू केली आहे. सरकारनं नियमावली ठरवून दिली आहे, तरीही ज्या रेस्टॉरंटमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश दिला जातो, त्यांच्यावरही कारवाई सुरू केली आहे. त्यांचे परवाने रद्द केले जातील. सरकार म्हणून जे करणं शक्य आहे, ते आम्ही करतोय. पण, मुंबईकरांना परत लॉकडाउन बघायचा नसेल, तर त्यांनी स्वतःची आणि कुटुंबाची जबाबदारी घेतली पाहिजे,अस सांगत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी परिस्थिती बिघडल्यास लॉकडाउन लागू करण्याचे संकेत दिले आहेत.