मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या सूचना व हरकतींच्या आधारे मुंबईत चार ठिकाणी कबुतरखाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. ठराविक वेळेत नियंत्रित पद्धतीने खाद्य टाकण्यात येणार असले तरीही या निर्णयाला मराठी एकीकरण समितीने विरोध केला आहे. आता चार ठिकाणे आहेत, मात्र, भविष्यात या ठिकाणांची संख्या हळूहळू वाढत जाण्याची भीती समितीकडून वर्तविण्यात आली आहे.
कबुतरांना ठराविक वेळेत नियंत्रित पद्धतीने खाद्य टाकण्याबाबतच्या तीन अर्जांवर पालिकेने नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या होत्या. त्यानंतर एकूण ९ हजार ७७९ सूचना व हरकती, तक्रारी आदी प्राप्त झाल्या. कबुतरखाना बंद करणे, सुरू ठेवणे, स्वच्छता राखणे, नियंत्रित पद्धतीने दाणे पुरवणे अशा सर्व पैलूंचा त्यात समावेश होता. त्यानुसार, महापालिकेने मुंबईत वरळी जलाशय, अंधेरीतील लोखंडवाला बॅक रोडवरील खारफुटी परिसर, मुलुंड येथील खाडीकडील परिसर आणि बोरिवलीतील गोराई मैदान आदी ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्याची परवानगी दिली. सकाळी ७ ते ९ या वेळेत कबुतरांना दाणे पुरवता येणार आहेत. मात्र, पालिकेच्या या निर्णयावर मराठी एकीकरण समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकेने या निर्णयापूर्वी जनतेकडून सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. बहुतांश हरकती आरोग्य धोक्यांबाबतच होत्या, ज्यात श्वसनाचे आजार, प्रदूषण आणि शहरातील गर्दीचा मुद्दा होता, असा दावा समितीने केला आहे. धार्मिक भावना आणि प्राण्यांच्या हक्कांचा दावा करणाऱ्या काही याचिकांवर उच्च न्यायालयाने आरोग्याला प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत. एका बाजूला प्राणीप्रेमींच्या मागण्या असल्या तरी, बहुसंख्य नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण हा पालिकेचा प्राधान्यक्रम असायला हवा, असे मत समितीने व्यक्त केले आहे. जनमत सर्व्हेनुसार, ७० टक्क्यांहून अधिक मुंबईकर या बंदीला पाठिंबा देत असल्याचे समितीचे म्हणणे आहे.सार्वजनिक जागांवर कबुतरांना खायला घालू नये आणि या निर्णयाचे पालन करावे. तसेच, उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मराठी एकीकरण समितीने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
….तरच कबुतरखान्यांना परवानगी
कबुतरांना खाद्य देण्याची परवानगी दिलेल्या चारही जागांवर कबुतरखान्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे आल्या तरच ही परवानगी देण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. कबुतरांना दाणे पुरवल्यामुळे वाहने व पादचारी यांना अडथळा होवू नये, कबुतरखान्याच्या जागी संपूर्ण स्वच्छता राखणे, नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्यांची दखल घेवून योग्य ती कार्यवाही करणे, या सर्व बाबींची दक्षता संबंधित संस्थेला घ्यावी लागेल. त्याअनुषंगाने संस्थेकडून प्रतिज्ञापत्र देखील घेतले जाणार आहे.
