scorecardresearch

१ लाख ८० हजारांना मुलाची खरेदी ; नांदेडच्या बालगृहचालिकेसह मुंबईतील दाम्पत्याला अटक

मूल होत नसल्याने त्याच्यासाठी आसुसलेल्या दक्षिण मुंबईतील एका दाम्पत्याने नांदेडच्या बालगृहातून दहा दिवसांचे एक मूल एक लाख ८० हजार रुपयांना विकत घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस आयुक्तांना आलेल्या एका निनावी पत्रामुळे सुमारे दोन वर्षांपूर्वीचे हे प्रकरण उजेडात आले. याप्रकरणी हे दाम्पत्य आणि बालगृहाच्या चालिकेसह मूल विकत घेण्यासाठी आर्थिक मदत करणाऱ्या दोन आप्तांना मुंबई […]

मूल होत नसल्याने त्याच्यासाठी आसुसलेल्या दक्षिण मुंबईतील एका दाम्पत्याने नांदेडच्या बालगृहातून दहा दिवसांचे एक मूल एक लाख ८० हजार रुपयांना विकत घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस आयुक्तांना आलेल्या एका निनावी पत्रामुळे सुमारे दोन वर्षांपूर्वीचे हे प्रकरण उजेडात आले. याप्रकरणी हे दाम्पत्य आणि बालगृहाच्या चालिकेसह मूल विकत घेण्यासाठी आर्थिक मदत करणाऱ्या दोन आप्तांना मुंबई पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या धक्कादायक प्रकाराच्या पाश्र्वभूमीवर मूलं विकणारं रॅकेट कार्यरत आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
दक्षिण मुंबईत राहणाऱ्या एका दाम्पत्याला मुलाची गरज होती. माहिती घेत असताना त्यांना नांदेड येथे ‘सुनीता’ या नावाने चालणाऱ्या खासगी बालगृहात मूल दत्तक मिळेल, अशी माहिती मिळाली. तेव्हा या दाम्पत्याने या बालगृहाच्या चालक सत्यश्री गुट्टे यांची ऑगस्ट २०१४ मध्ये भेट घेतली. गुट्टे यांनी मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट असून त्याला फाटा द्यायचा असेल तर तुम्ही १ लाख ८० हजार रुपयांना मूल विकत घेऊ शकता, असे सांगितले. मुलाची गरज असल्याने या दाम्पत्याने १० दिवसांचे मूल विकत घेतले.
मार्च २०१६ मध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तांना एक निनावी पत्र आले. या पत्रात या संपूर्ण व्यवहाराची माहिती देण्यात आली होती. आयुक्तांनी या प्रकाराचा तपास समाजसेवा शाखेकडे सोपवला. समाजसेवा शाखेने माहिती घेऊन या पत्रातील माहितीत तथ्य असल्याचे सांगितले. त्यानुसार, हे प्रकरण ताडदेव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.
सत्यश्री या त्यांच्या सासूच्या नावाने हे बालगृह चालवत होत्या, त्यांना दत्तकप्रक्रियेची पूर्ण माहिती असूनही त्यांनी या दाम्पत्याला मूल विकत दिले. पोलिसांचे एक पथक नांदेड येथे गेले तिथून सत्यश्री यांना अटक करण्यात आली. या दाम्पत्याला हे मूल विकत घेण्यासाठी त्यांची बहीण व मेहुणा यांनी आर्थिक मदत केली होती. त्यामुळे त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे, असे ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश देवडे यांनी सांगितले. सत्यश्री यांनी आणखी काही जणांना मूल विकले आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

ममतेचा बाजार..
* दक्षिण मुंबईत राहणाऱ्या दाम्पत्याला मुलाची गरज होती.
* त्यांना नांदेड येथे ‘सुनीता’ या खासगी बालगृहात मूल दत्तक मिळेल, अशी माहिती मिळाली.
* मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट असून त्याला फाटा द्यायचा असेल तर १ लाख ८० हजार रुपयांना मूल विकत घेऊ शकता, असे बालगृहाच्या चालक सत्यश्री गुट्टे यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये सांगितले.
* मुलाची गरज असल्याने दाम्पत्याने १० दिवसांचे मूल विकत घेतले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai couple arrested for buying child

ताज्या बातम्या