मुंबई : जवळपास नऊ वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणे आणि हळदीच्या कार्यक्रमादरम्यान तिला फ्लाईंग किस देणे २६ वर्षांच्या तरूणाला चांगलेच महागात पडले आहे. कनिष्ठ न्यायालयाने त्याला लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे आरोपीचा विवाह झाला असून त्याला तीन महिन्यांचे बाळ आहे.
फ्लाइंग किस हा नाचताना केलेला हावभाव असल्याचा दावा आरोपीच्या वतीने करण्यात आला होता. तथापि, न्यायालयाने त्याचा हा दावा फेटाळून लावला. तसेच, अल्पवयीन मुलीला फ्लाईंग किस देणे हा लैंगिक स्वरूपाचा हावभाव असून त्यामुळे तिच्या सन्मानाचा भंग होतो आणि ही कृती लैंगिक छळाच्या कृत्यात मोडते, असे निरीक्षण न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवताना नोंदवले.
पीडितेच्या आईला माहिती देणारा शेजारी हा आपला नातेवाईक असून त्याच्यासह कौटुंबीक वाद सुरू असल्यामुळे त्याने आपल्याविरोधात खोटे आरोप केल्याचा दावाही आरोपीने केला होता. परंतु, आरोपींच्या कुटुंबियांचे संबंधित शेजाऱ्यांशी आधी कोणतेही वैर नव्हते. तसेच कोणतेही पालक शेजाऱ्यांकरिता त्यांच्या मुलीची प्रतिष्ठा मलिन अथवा धोक्यात घालणार नाहीत, असेही न्यायालयाने आरोपीचा हा दावाही फेटाळताना प्रामुख्याने स्पष्ट केले. तसेच, आरोपीला त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरवून तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
नऊ वर्षांपूर्वी, म्हणजेच ३१ जानेवारी २०१७ रोजी एका हळदीच्या कार्यक्रमादरम्यान, त्यावेळी १९ वर्षांच्या असलेल्या आरोपीने अल्पवयीन मुलीला फ्लाइंग किस दिला होता. एका शेजाऱ्याने मुलीच्या आईला याबद्दल माहिती दिली. तेव्हा, मुलीने याआधीही शिकवणीला जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केल्याचे आणि त्याने तिचा हात धरून तिला त्याच्याकडे ओढल्याचे सांगितले.
या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने सुरुवातीला पालकांना याबाबत काहीच सांगितले नाही. परंतु, हळदीच्या कार्यक्रमादरम्यान घडलेल्या प्रकारानंतर मुलीच्या वडिलांनी आरोपी आणि त्याच्या आईला घरी बोलावून त्याला मुलीपासून दूर राहण्यास सांगितले. तथापि, आरोपी आणि त्याच्या कुटुंबाने मुलीच्या कुटुंबाशी गैरवर्तन केल्याचा आरोप झाल्यानंतर आरोपीविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
