मुंबई : दोन विविध खटल्यांतील ४४ सोमाली नागरिकांना मुंबईतील विशेष न्यायालयाने सोमवारी चाचेगिरी आणि इतर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचवेळी, सर्व प्रकारची जोखीम पत्करून आपली कायदेशीर व आंतरराष्ट्रीय कर्तव्ये कठोरपणे पार पाडणाऱ्या भारतीय नौदलाच्या शौर्याचेही न्यायालयाने निकाल देताना कौतुक केले.
आरोपींनी केलेले गुन्हे गंभीर स्वरूपाचे होते, असे निरीक्षणही विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. दिघे यांनी आरोपींना जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावताना नमूद केले. एका खटल्यातील ३५ आणि दुसऱ्या खटल्यातील नऊ अशा सर्व ४४ आरोपींनी न्यायालयासमोर आपला गुन्हा कबूल केला होता आणि शिक्षेत दया दाखवण्याची याचना केली होती. आरोपींची हलाखीची परिस्थिती आणि त्यांनी स्वेच्छेने गुन्हा कबूल केला आहे, याची आपल्याला जाणीव असल्याचेही न्यायालयाने म्हटले. परंतु. भरसमुद्रात जहाज अपहृत करून चाचेगिरी करणे, खंडणीसाठी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवणे, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मानवी ढाल म्हणून वापरणे आणि भारतीय नौदलाच्या कायदेशीर सूचनांचे पालन न करणे या अत्यंत गंभीर गोष्टी आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने आरोपींची शिक्षेत दया दाखवण्याची विनंती फेटाळताना नोंदवले.
आरोपींना भारतीय दंड संहिता, शस्त्र कायदा, पारपत्र कायदा, परदेशी नागरिक कायदा, सागरी चाचेगिरी विरोधी कायदा आणि स्फोटक पदार्थ कायदा याअंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. नऊजण आरोपी असलेल्या खटल्याबाबत सरकारी पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, एडनच्या सामुद्रधुनीत चाचेगिरीविरोधी मोहिमेसाठी भारतीय नौदलाची ””आयएनएस त्रिशूल”” आणि ””आयएनएस सुमेधा”” ही जहाजे तैनात करण्यात आली होती. मार्च २०२४ मध्ये, इराणच्या ””एफव्ही अल कंबर”” या जहाजाकडून अपहरणाचा इशारा मिळाला. त्यानंतर ””आयएनएस त्रिशूल”” आणि ””आयएनएस सुमेधा”” यांनी तत्पर प्रतिसाद देऊन नऊ सोमाली नागरिकांना अटक केली. चाच्यांनी इराणी जहाजावरील कर्मचाऱ्यांना खंडणीसाठी तीन दिवस ओलीस ठेवले होते आणि एके-४७ रायफल्स, हँड ग्रेनेड्स यासारख्या प्राणघातक शस्त्रांच्या जोरावर त्यांना जीवे मारण्याची किंवा इजा पोहोचवण्याची धमकी दिली होती. रोपींनी भारतीय युद्धनौकांवर गोळीबारही केला होता आणि त्यामुळे त्यांनी दहशतवादी कृत्य केले होते. ठी त्यांना कठोरतम शिक्षा मिळायला हवी, असा दावा सरकारी पक्षाने आरोपींना कठोर शिक्षेची मागणी करताना केला होता.
तथापि, ते गरीब आणि अशिक्षित सोमाली नागरिक असून त्यांच्या घरी लहान मुले आहेत. शिवाय, त्यांनी स्वेच्छेने आपला गुन्हा कबूल केला आहे ही बाब विचारात घ्यावी, असे नऊ आरोपींनी शिक्षेत दया दाखवण्याची याचना करताना केली होती. भारत आणि सोमालिया यांच्यात सौहार्दपूर्ण राजनैतिक संबंध असल्याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले होते.
दुसऱ्या प्रकरणात, डिसेंबर २०२३ मध्ये ””आयएनएस कोलकाता””ने ३५ आरोपींना ताब्यात घेतले होते. हे सर्व सोमालियाचे नागरिक असून, त्यांनी ””एमव्ही एक्स-रुएन”” या माल्टाचा ध्वज असलेल्या ””बल्क कॅरियर”” जहाजाचे अपहरण केले होते. या आरोपींवर बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत (युएपीए) आरोप ठेवण्यात आले होते आणि त्यांनाही दोषीही ठरवण्यात आले होते.
