मुंबई : मुंबईतील माझगाव, दिंडोशी आणि एस्प्लनेड येथील न्यायालयांना बॉम्बस्फोट घडविण्याच्या धमक्या देणारे ई-मेल सोमवारी प्राप्त झाल्याने शहरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी तिन्ही न्यायालयांच्या परिसरात तपासणी मोहीम राबविली. बॉम्बशोधक व नाशक पथकाने श्वानपथकाच्या मदतीने न्यायालयांच्या इमारती आणि परिसराची झडती घेतली. मात्र, या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळली नाहीत.

मुंबईतील न्यायालयांना धमकीचे ई-मेल मिळाल्याने न्यायालयीन परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. न्यायालयात येणारे नागरिक, वकील आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी खबरदारी घेतली. संबंधित परिसराची तपासणी पूर्ण होईपर्यंत सुरक्षा यंत्रणा तैनात ठेवण्यात आली होती. धमकीच्या ई-मेलमध्ये नेमक्या कोणत्या वेळेत स्फोट घडविण्यात येईल, याबाबत उल्लेख असल्याने पोलिसांनी तातडीने तपासणी सुरू केली.

या ई-मेलमध्ये मुंबईतील मेट्रो स्थानकांवर ९ नोव्हेंबरला हल्ला करण्याची तसेच २७ नोव्हेंबरला महालक्ष्मी रेसकोर्स येथे आयोजित गायक दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमाला लक्ष्य करण्याची धमकीही देण्यात आल्याचे समोर आले आहे. कार्यक्रमस्थळी भ्रमणध्वनीमध्ये स्फोटक उपकरण लपविण्याचा उल्लेखही ई-मेलमध्ये करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे न्यायालयांपुरतीच नव्हे, तर शहरातील सार्वजनिक ठिकाणे आणि मोठ्या कार्यक्रमांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त होत आहे.

मुंबई पोलिसांनी धमकीचे ई-मेल पाठविणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. ई-मेलचा उगम, तो पाठविण्यासाठी वापरलेले संगणकीय जाळे आणि संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी गुन्हे शाखा आणि सायबर कक्षाकडून तांत्रिक तपास केला जात आहे. धमकीमागे एकच व्यक्ती किंवा संघटित गट आहे का, तसेच यापूर्वी प्राप्त झालेल्या धमकीच्या ई-मेलशी या प्रकरणाचा संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे.

दरम्यान, मुंबईच्या महापौर कार्यालयालाही २३ ऑक्टोबर रोजी धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता. त्यात काही सार्वजनिक ठिकाणे आणि दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमाचा उल्लेख होता. त्यानंतर न्यायालयांना मिळालेल्या धमक्यांमध्येही काही समान उल्लेख आढळल्याने या घटनांचा परस्पर संबंध आहे का, हा तपासाचा महत्त्वाचा आहे. मात्र, या सर्व धमक्यांमागे एकच व्यक्ती किंवा गट असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोट घडविण्याच्या धमक्या देणारे ई-मेल सोमवारी प्राप्त झाल्याने राज्यभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. त्यामध्ये ठाणे, पुणे, हिंगोली, बीड आणि नांदेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयांनाही धमकीचे ई-मेल मिळाले होते.