कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंमलबजावणी संचालनालयानं ( ईडी ) कोविड घोटाळ्याबाबत आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यानुसार घोटाळ्यातील रकमेतून सोन्याची बिस्किटं खरेदी करण्यात आली. ही बिस्किटं लाचेच्या स्वरूपात मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांना दिली, असा दावा ईडीच्या आरोपपत्रात केला आहे.
ईडीनं १५ सप्टेंबर रोजी लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार सुजीत पाटकरांसह हेमंत गुप्ता, संजय शाह आणि राजीव साळुंखे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोपपत्रात मुंबई महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. किशोर बिसुरे, डॉ. अरविंद सिंग, दहिसर जंम्बो कोविड सेंटरचे डीन यांचाही समावेश आहे.
हेही वाचा : “सुजित पाटकरने १०० कोटींचा घोटाळा कसा केला?” किरीट सोमय्यांनी सगळंच सांगितलं
ईडीनं आरोपपत्रात सांगितल्यानुसार, संजय शाह यांनी ६० लाख रूपयांची सोन्याची बिस्किटं आणि बार खरेदी केले. हे सुजित पाटकर यांच्यामार्फत महापालिका अधिकारी आणि अन्य व्यक्तींना लाचेच्या स्वरूपात देण्यात आले. तसेच, सुजित पाटकरांनी १५ लाख रूपयांची रक्कम महापालिका कर्मचाऱ्यांना दिली.
जुलै ते डिसेंबर २०२० या दरम्यान दहिसर कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉ. किशोर बिसुरे यांना लॅपटॉपसह २० लाख रूपयांची रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू मिळाल्याचेही ईडीनं आरोपपत्रात सांगितलं आहे.
लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीनं खोटी कागदपत्र सादर करून कंत्राट मिळवलं. कंत्राट मिळाल्यानंतर योग्य मनुष्यबळ न पुरवता करोना रुग्णांचा जीव धोक्यात घातला. कंपनीनं गैरमार्गानं २१.०७ कोटी रूपये कमावले आहेत, असेही ईडीनं आरोपपत्रात नमूद केलं आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने हे वृत्त दिलं आहे.