मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करून मुलुंड परिसरात काही दिवसांपूर्वी एका ७१ वर्षीय वृद्ध महिलेकडून तिघांनी अडीच लाख रुपयांचे दागिने लंपास केले होते. याबाबत तपास करत मुलुंड पोलिसांनी तीन सराईत चोरांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला.

तक्रारदार महिला या मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असून २ डिसेंबरला जटाशंकर रोड येथे जात होत्या. यावेळी त्यांना रस्त्यात तिघांनी अडवले. आपण पोलीस असून रस्त्यात पुढे काही चोरट्यांनी महिलांचे दागिने लुटले आहेत. त्यामुळे तुम्ही तात्काळ तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा असे महिलेला सांगितले. त्यानुसार महिलेने तिच्याकडे असलेली एक सोनसाखळी आणि दोन अंगठ्या हातात काढून ठेवल्या.

याच वेळी आरोपींनी महिलेला बोलण्यात गुंतवून दागिने घेऊन पोबारा केला. काही वेळानंतर महिलेच्या ही बाब लक्षात येताच तिने तात्काळ मुलुंड पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून एका आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मीरा रोड येथून त्याला अटक केली. त्यानंतर त्याच्या इतर दोन साथीदारांनादेखील पोलिसांनी अटक केली आहे. तौफिक सिद्दिकी (४१), सीमोन्स गोंसालविस (६३) आणि शरीफ सिद्दिकी (५१) अशी अटक आरोपींची नावे असून, तिघेही सराईत चोर आहेत. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.