Stock Market Fraud Case Mumbai: शेअर बाजारात भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातच्या वलसाड येथून अटक केली आहे. रोहन भूषण शेठ (वय ५६) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात नुकतेच न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. डोक्यावर महागडा विग, तीन नावांची ओळख आणि आलिशान जीवनशैलीच्या जोरावर त्याने महाराष्ट्र आणि गुजरातमधील तब्बल ४२ गुंतवणूकदारांना सुमारे ३०.२६ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. द इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे.
५ टक्के परताव्याचे आमिष
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन शेठ स्वतःला शेअर बाजारातील एक मोठा आणि यशस्वी व्यावसायिक भासवत असे. सायन आणि माटुंगा परिसरातील आलिशान सदनिकांमध्ये तो गुंतवणूकदारांना चर्चेसाठी बोलवायचा. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी संगणकावर बनवलेले नफ्याचे खोटे एक्सेल शीट्स आणि बनावट बँक विवरणे दाखवून तो दरमहा ३ ते ५ टक्के परताव्याचे आमिष दाखवत असे. प्रत्यक्षात लोकांचे पैसे शेअर बाजारात गुंतवलेच जात नव्हते. सुरुवातीला काही महिने परतावा देऊन त्याने लोकांचा विश्वास जिंकला आणि त्यानंतर मोठी रक्कम उकळून अचानक परतावा देणे बंद केले.
वृद्धाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
कांदिवली येथील रहिवासी संजय हिरालाल शाह (वय ६०) यांच्या तक्रारीनंतर हा महाघोटाळा उघड झाला. शाह यांच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलाशी रोहन शेठचा २०२० मध्ये शेअर ट्रेडिंग ॲप बनवण्याच्या निमित्ताने संपर्क आला होता. करोना काळात त्याने शाह यांच्याशी ओळख वाढवली आणि ट्रेडिंग शिकवण्याच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. शाह कुटुंबियांची तब्बल १०.८१ कोटी रुपयांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन तक्रार नोंदवली.
तीन नावे, तीन आयुष्य आणि विगचे गूढ
तपासादरम्यान पोलिसांना आरोपीच्या दुहेरी नव्हे तर तिहेरी आयुष्याची माहिती मिळाली, ज्यामुळे तपास यंत्रणाही चक्रावून गेली. आरोपीचे पहिले नाव जयेश हसमुखभाई शाह होते. महाविद्यालयीन काळापर्यंत आणि अधिकृत ओळखपत्रांवर हेच नाव होते. यानंतर दिल्लीत सुमारे दशकभर तो राहुल अतुलभाई पारेख या नावाने राहिला; तिथे त्याने याच नावाने लग्न केले आणि त्याला मुलेही झाली.

पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर त्याने मुंबईत रोहन भूषण शेठ या नावाने वावरण्यास सुरुवात केली. याच नावाने त्याने घोटाळे केले.
विशेष म्हणजे टक्कल असलेला रोहन गुंतवणूकदारांसमोर जाताना अतिशय दर्जेदार विग लावून दाट केसांच्या रुपात जायचा. मात्र, घरात किंवा वैयक्तिक आयुष्यात तो विग न घालता वावरायचा. त्यामुळे त्याचे छायाचित्र आणि प्रत्यक्ष रूप यात मोठी तफावत दिसत होती. आरोपपत्रात पोलिसांनी ३७ साक्षीदारांचा समावेश केला असून, त्यात त्याच्या विगची निगा राखणाऱ्या सलून कर्मचाऱ्यांचाही जबाबा नोंदवला गेला.
वलसाडमध्ये पोलिसांची कारवाई
डिसेंबर २०२५ पासून परतावा थांबवल्यानंतर एप्रिलमध्ये रोहन शेठ सायन येथील घरातून मौल्यवान सामानाच्या दोन मोठ्या बॅगा भरून फरार झाला आणि त्याने सर्व फोन बंद केले. रोहन शेठने २०२१ साली दुसरे लग्न केले होते. या पत्नीचा आजारपणामुळे मृत्यू झाला. तिच्या नावावरील क्रेडिट कार्डचा उपयोग करून त्याने गुजरातमध्ये एका मोबाइलची खरेदी केली. यावरून पोलिसांनी त्याचा माग काढला. मोबाइल व्यवहाराचा तपास करत पोलीस त्या दुकानापर्यंत पोहोचले. मोबाइलच्या IMEI नंबरवरून जीपीएस ट्रॅक करत पोलिसांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला.
अखेर वलसाडमधील तो राहत असलेल्या ठिकाणी पोलीस पोहोचले. मात्र तेथील सुरक्षा रक्षक किंवा स्वच्छता कर्मचारी शेठच्या फोटोवरून त्याला ओळखू शकले नाहीत. दाट केसांच्या रोहनला कोणी ओळखत नव्हते, कारण तो विग न वापरता वावरत होता. अखेर तीन दिवस पाळत ठेवल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ‘हाऊसकीपिंग’ कर्मचाऱ्यांचा वेश परिधान करून त्याच्या सदनिकेची बेल वाजवली. दरवाजा उघडताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
करोडोंची मालमत्ता जप्त
आरोपीकडून १.६७ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, १७ लाख रुपयांची रोकड, रोलेक्स आणि ह्युब्लोसारखी १४ महागडी आयात केलेली घड्याळे, बीएमडब्ल्यू, मर्सिडीजसह चार लक्झरी वाहने जप्त केली आहेत. याशिवाय गुन्ह्यातील पैशांतून खरेदी केलेल्या सायन, माटुंगा आणि गुजरातमधील प्रत्येकी सुमारे ५ कोटी रुपये किमतीच्या तीन आलिशान सदनिकाही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
