मुंबईः हस्तीदंतापासून तयार करण्यात आलेली कोरीव काठी विकण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील घाटकोपर परिसरातून पकडले. आरोपींकडून हस्तीदंतावर कोरीव काम केलेली काठी जप्त करण्यात आली असून आंतरराष्ट्रीय बाजारात तिची किंमत १० लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हस्तीदंताची काठी व दोन आरोपींना पुढील कारवाईसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
घाटकोपर पश्चिम येथील दोन व्यक्ती हस्तीदंत विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-५ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज चौधरी यांना मिळाली होती. त्यांनी याबाबतची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांना दिली असता त्यांनी तात्काळ आरोपींविरोधात कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने एल.बी.एस. मार्गावरील सर्वोदय रुग्णालयाजवळ सापळा रचला.
ठाण्यातील तीन हात नाका येथील परिक्षेत्र वन अधिकारी वन्यजीव, मुंबई यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानुसार वनविभागातील एक अधिकारी व दोन कर्मचारी पोलिसांसोबत उपस्थित होते. मिळालेल्या माहितीप्रमाणे तेथील मेट्रो पुलाखाली दोन संशयीत रात्री ८ च्या सुमारास आले. पोलिसांना मिळालेल्या माहितीशी साधर्म्य असलेल्या दोन संशयीत व्यक्ती पुलाखाली घुटमळताना आढळल्या. पोलिसांनी तात्काळ या दोन व्यक्तींना अडवले व तेथे येण्याचे कारण विचारले. त्यांनी उडवउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे सदर काठी सापडली.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून काठी हस्तीदंतापासून तयार केल्याचे सांगितले. त्यानंतर हस्तीदंतापासून तयार केलेल्या काठीसह दोन्ही आरोपींना वन परिमंडळ अधिकारी जनार्दन भोसले, वनरक्षक विक्रम पवार व ज्योती भोसले यांच्या ताब्यात देण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या हस्तीदंताच्या काठीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १० लाख रुपये आहे. आरोपींना हस्तीदंत कोठून मिळाले, यामागे हत्तीची शिकार करणाऱ्या टोळीचा सहभाग आहे का याबाबत वनविभाग अधिक तपास करीत आहेत.