महिलेशी प्रेमसंबंध असल्यामुळे तिच्या पतीची हत्या करणाऱ्याला समतानगर पोलिसांनी अटक केली. दिनेश पोसाराम प्रजापती असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी समता नगर पोलिसांनी सुरेशकुमार मांगीलाल कुमावत याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमावतचे प्रजापतीच्या पत्नीशी विवाहबाह्य संबंध होते आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी आरोपीने प्रजापतीवर हातोड्याने हल्ला करून त्याची हत्या केली. त्यानंतर कुमावत यांनी मृतदेह गोणीत भरून आठ किलोमीटर अंतरावर ठाण्यातील जंगलात पुरला होता.
हेही वाचा >>>मुंबईः रिक्षा भाड्यावरून वादानंतर प्रवाशावर अनैसर्गिक अत्याचार; अज्ञात चालकाविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा




३७ वर्षीय प्रजापती १ जूनपासून बेपत्ता होता. २ जूनला समता नगर पोलील ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर झोन-१२च्या उपायुक्त स्मिता पाटील यांनी प्रजापतीच्या शोधासाठी अनेक पथके तयार केली. वरिष्ठ निरीक्षक प्रवीण राणे यांच्या देखरेखीखाली पथकांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असता १ जूनला प्रजापती त्याच्या मोटरसायकलवरून राजेंद्र नगरमधील एका चाळीत शिरला. परंतु बाहेर आला नव्हता. मात्र, दुसरी व्यक्ती चाळीतून बाहेर पडून प्रजापतीच्या मोटारसायकलवरून जाताना दिसली. ती व्यक्ती प्रजापती याच्या स्कूटरवरून पांढरी प्लास्टिकची गोण घेऊन परिसरातून निघून जात असल्याचे सीसीटीव्ही चित्रणात दिसून आले.
हेही वाचा >>> तरुणीची हत्या करून सुरक्षा रक्षकाची आत्महत्या; मरीन ड्राईव्ह येथील घटना, बलात्काराचा संशय
पोलिसांनी संशयीताचा दूरध्वनी क्रमांक मिळवून त्याचा माग काढून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, कुमावत हा बोरिवली पूर्वेतील रहिवासी असून त्याने प्रजापतीची हत्या केल्याचे कबूल केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रजापतीची पत्नीचे कुमावतशी प्रेमसंबंध होते. त्याबाबत जेव्हा प्रजापतीला कळल्यानंतर त्याने विरोध केला. त्यामुळे संतप्त झालेल्या कुमावतने प्रजापतीचा काटा काढण्याचे ठरवले. काही बहाण्याने आरोपीने प्रजापतीला बोरिवली (पूर्व) येथील एका चाळीच्या खोलीत नेले. त्यावेळी त्या दोघांचा वाद झाला. त्यात कुमावतने प्रजापतीच्या डोक्यावर हातोड्याने हल्ला करून त्याची हत्या केली. कुमावतने प्रजापतीचा मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत भरून सर्व पुरावे नष्ट करण्याच्या हेतून घोडबंदर रोडवरील जंगलात सुमारे आठ किमी अंतरावर नेऊन पुरला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कुमावत पोलिसांना जंगलात घेऊन गेला तिथे प्रजापतीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी प्रजापतीचा अर्ध कुजलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.