तपासचक्र : ‘दृश्यम’चा वेगळा शेवट!

टिळकनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण अधिकारी खैर यांनी सुटकेसभोवती लक्ष केंद्रित केले. ‘

Murder , Crime , Pune , chopper and swords , Loksatta, Loksatta news, marathi, Marathi news
Murder in Pune : . शिवराज खंडाळे आणि सिराज कुरेशी यांच्यात मागील तीन महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते.

लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात पोलिसांना एका बेवारस सुटकेसमध्ये अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळला. हा मुलगा कोण होता याबाबत कुठलाही दुवा नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याचे छायाचित्र राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पाठवले. परंतु काहीही केल्या तपास पुढे सरकतच नव्हता.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

लाल रंगाची सुटकेस एवढाच काय तो तपासासाठी दुवा होता. ही सुटकेस कोणी ठेवली असावी, यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. अखेर ही सुटकेस तेथे आणून टाकणाऱ्या एका गर्दुल्ल्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. परंतु ही सुटकेस आपल्याला टर्मिनसच्या एका आड बाजूला पडलेली आढळली. सुटकेस जड वाटल्याने त्यात काही तरी मौल्यवान वस्तू सापडेल या आशेने त्या गर्दुल्ल्याने ती ताब्यात घेतली. परंतु सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्याने तो घाबरला आणि त्याने पुन्हा सुटकेस टर्मिनस परिसरात आणली. त्याच वेळी तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये टिपला गेला. त्याचा या खुनाशी काहीही संबंध नसल्याची पोलिसांनी खात्री पटली. मात्र मृतदेहाबाबतची माहिती लपविली म्हणून त्याला अटक करण्यात आली.

टर्मिनस परिसरातील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी पोलिसांची विविध पथके तनात करण्यात आली. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज लोहिया आणि उपायुक्त शहाजी उमप जातीने तपासावर लक्ष ठेवून होते. पण ठोस हाती काहीही मिळत नव्हते. हा मुलगा कोण आहे किंवा तो हरवल्याबाबतचा तपशीलही हाती लागत नव्हता. खबऱ्यांनाही कामाला जुंपण्यात आले होते. परंतु या हत्याकांडाची उकल काही केल्या होत नव्हती.

टिळकनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण अधिकारी खैर यांनी सुटकेसभोवती लक्ष केंद्रित केले. ‘ट्रॅव्हलगो’ या ब्रॅण्डेड कंपनीची ही सुटकेस कोणी आणि कोणाला विकली याचा तपशील मिळतो का, याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले. कंपनीकडे या सुटकेसबद्दलची माहिती पाठविण्यात आली. कंपनीकडून ज्या डीलरला ही सुटकेस विकली होती, त्याची माहिती मिळाली. या डीलरकडे संपर्क करून ती कोणत्या दुकानात विकण्यासाठी पुरविण्यात आली होती याचा तपशील मिळविण्यात आला. मालाड येथील एका दुकानाचा पत्ता मिळाला. सुदैवाने या दुकानात सीसीटीव्ही फुटेज असल्यामुळे ही नेमकी सुटकेस खरेदी करणाऱ्यांची छायाचित्रे मिळाली. रोकड देऊन सुटकेस खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे या व्यक्तींच्या सीसीटीव्ही फुटेजऐवजी बाकी काहीही तपशील उपलब्ध नव्हता. या दोघांची छायाचित्रे घेऊन पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि तपासाचे धागेदोरे पोलिसांना सापडले. मालाड पूर्वेतील कुरार गावातील बांगडय़ा (इमिटेशन ज्वेलरी) बनविण्याच्या कारखान्यापर्यंत पोलीस पोहोचले. त्यानंतर सुटकेसमध्ये दडवलेला मृतदेह कोणाचा होता याची माहिती मिळवणे व त्याच्या हत्याकांडाची उकल करणे पोलिसांना कठीण गेले नाही.

बिहारहून अर्थार्जनासाठी मुंबईत आलेल्या बारा वर्षांच्या रणधीरचा हा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. शिवनाथ सहानी यांच्या मालकीच्या कारखान्यात अन्य १५ मजुरांसह तोही काम करीत असे. तो तेथेच कारखान्याच्या पोटमाळ्यावर राहत असे. काही कारणास्तव त्याची सहानी यांचा मुलगा रणविजय याच्याशी नेहमी बाचाबाची होत असे. तो कामचुकार आहे, असे रणविजयचे म्हणणे. परंतु रणधीर ते ऐकण्याऐवजी रणविजयशीच वाद घालत असे. ७ जानेवारी रोजी रणविजयने पुन्हा त्याला कामचुकारपणाबद्दल सुनावले. दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. मात्र या वेळी संतापलेल्या रणविजयने त्याचे नाक व तोंड दाबून त्याला गुदमरण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रणधीर कामावर जाण्यासाठी उठला नाही तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. घाबरलेल्या रणविजयने ही बाब आपल्या आई-वडिलांना सांगितली. आता खुनाच्या गुन्ह्यात मुलगा तुरुंगात जाणार या काळजीने त्यांनी रणधीरच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या दोन नातेवाईकांना विश्वासात घेतले. हे दोन्ही नातेवाईक मालाडमधील सुटकेसच्या दुकानात गेले आणि त्यांनी मोठी सुटकेस खरेदी केली.

या सुटकेसमध्ये रणधीरचा मृतदेह कोंबण्यात आला. ही सुटकेस बिहारला जाणाऱ्या पुरी एक्स्प्रेसमध्ये ठेवावी, अशी त्यांची योजना होती. परंतु कुर्ला टर्मिनस येथे सुटकेस स्कॅनरमुळे आपले िबग फुटेल, असे वाटून त्यांनी ही सुटकेस एका आडवाटेला ठेवली आणि ते निघून गेले. आडवाटेला असलेल्या सुटकेसमध्ये काही तरी मौल्यवान वस्तू मिळेल, असे वाटून एका गर्दुल्ल्याने ती नेली. त्यामुळे तो सीसीटीव्ही फुटेजमध्येही आला होता.

रणधीर गायब होण्याची कुटुंबीयांना खबर लागू नये यासाठी त्याच्या बिहारमधील वैशाली जिल्हय़ातील गावी जाऊन सहानी यांच्या एका नातेवाईकाने कुटुंबीयांची भेटही घेतली. रणधीरचा आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात आले, असे सांगून एक लाख दहा हजार रुपयेही कुटुंबीयांच्या हाती ठेवण्यात आले. सहानी कुटुंबीयांचे प्रस्थ मोठे असल्यामुळे रणधीरचे कुटुंबीयांनीही कोणत्याही संशयाविना ही ‘कहाणी’ मान्य केली. परंतु, सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्यापासून खुन्यांना जंग जंग पछाडणाऱ्या पोलिसांनी नेमके धागे जोडत आरोपींभोवती कडे गुंफले. या प्रकरणी शिवनाथ सहानी (४५), त्याची पत्नी रेणू (३५), मुलगा रणविजय (२०) यांच्यासह त्यांचे नातेवाईक कृष्णा (२८), रामानंद (४५) आणि विनय (३३) यांना अटक करण्यात आली आहे.

अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपटाची आठवण यावी, अशी ही तपासकथा. खुनाच्या आरोपातून मुलीला वाचवण्यासाठी एक बाप पोलिसांना कसा गुंगारा देतो, हे ‘दृश्यम’मधून दिसले. नेमके तेच या प्रकरणातही दिसून आले. पण ‘दृश्यम’मधल्या पित्यासारखा सहानी यांचा परिवार यशस्वी होऊ शकला नाही. या ‘दृश्यम’चा शेवट वेगळाच ठरला.

निशांत सरवणकर @ndsarwankar

nishant.sarvankar@expressindia.com

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai crime mumbai police solve murder case of 12 year old boy

ताज्या बातम्या