Mumbai Crime मुंबईतल्या दादर स्टेशनवर तुतारी एक्स्प्रेसमधून सूटकेस नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी संशय आल्याने हटकलं. त्यांच्या सूटकेसमध्ये काय आहे हे पाहिलं असता एक मृतदेह होता. या प्रकरणातले आरोपी मूकबधिर होते. दादर स्टेशनच्या फलाट क्रमांक ११ वर आलेली तुतारी एक्स्प्रेस त्यांनी घाईने पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांच्याकडे असलेली सूटकेस नेताना दोघांनाही घाम फुटला होता. पोलिसांनी चार तासांत या प्रकरणाची ( Mumbai Crime ) उकल केली. आरोपी मूक बधिर होते तरीही कशी अटक केली? नेमकं काय घडलं ते सगळं पोलिसांनी सांगितलं आहे. नेमकी काय घटना घडली? दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ११ येथे दोन मूकबधीर व्यक्ती तुतारी एक्सप्रेसमध्ये चढत होते. या दोघांकडे चाकं असलेली एक ट्रॉली बॅग होती. मात्र, ही बॅग ट्रेनमध्ये चढवताना या दोघांची प्रचंड दमछाक झाली होती. बॅगेच्या वजनामुळे दोघांनाही बॅग रेल्वे गाडीत चढवताना चांगलाच घाम फुटला होता. त्यावेळी या फलाटावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोषकुमार यादव आणि पोलीस अंमलदार माधव केंद्रे हे गस्तीवर होते. त्यांना या दोन्ही व्यक्तींची हालचाली बघून संशय आला. त्यामुळे त्यांनी या दोघांना थांबवून बॅग उघडायला सांगितली. ही बॅग उघडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. या बॅगेत रक्ताने माखलेला एक मृतदेह ( Mumbai Crime ) कोंबून ठेवला होता. या मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर घाव होते. पोलिसांनी संबंधित व्यक्ती आणि बॅग ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली. या तपासणीत हा मृतदेह ( Mumbai Crime ) अर्शद अली सादिक अली शेख (वय ३०) याचा असल्याचे समजले. हे पण वाचा- Mumbai Crime News: नवरा बायकोच्या वादाला हिंसक वळण; गिरगावात दिवसाढवळ्या घडलं काय? पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी या प्रकरणातले ( Mumbai Crime ) आरोपी मूक बधिर होते त्यामुळे त्यांना पकडणं हे आव्हान होतं असं पोलिसांनी सांगितलं. अधिकारी ऋषीकुमार शुक्ला यांनी सांगितलं, "४ ऑगस्टला रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी तुतारी एक्स्प्रेस आली. ही एक्स्प्रेस कोकणात जाते आणि या ट्रेनला गर्दी असते. त्यामुळे आमचा बंदोबस्त तैनात होता. जनरल डब्यात एक संशयित मोठी बॅग घेऊन चढला होता. ती बॅग त्याला नीट सांभाळताही येत नव्हती आणि तो खूप घाबरला होता. त्यानंतर आमचे कॉन्स्टेबल संतोष यादव यांनी त्याला हटकलं त्यांनी जेव्हा बॅग पाहिली तेव्हा त्यांना लक्षात आलं की बॅगेचा भाग उघडा आहे आणि त्यात रक्त आहे. त्यांना वाटलं की यात मृतदेह आहे. त्यानंतर त्यांनी तातडीने RPF शी संपर्क साधला. तोपर्यंत त्या माणसाला पकडून ठेवलं. त्यानंतर RPF आणि GRP आले त्यानंतर आम्ही पुढची चौकशी सुरु केली." मध्य रेल्वेचे डीसीपी ऋषी कुमार यांनी ही माहिती दिली आहे. साईन लँग्वेज एक्स्पर्टची मदत घेतली पुढे ऋषीकुमार म्हणाले, "GRP कडून या प्रकरणी चौकशी सुरु केली. या प्रकरणातले आरोपी मूकबधिर होते. त्यामुळे साईन लँग्वेज मधल्या तज्ज्ञांना बोलवण्यात आलं. त्यांनी त्याद्वारे आणि इतर खुणांनी काय काय घडलं ते सांगितलं. त्यानंतर आम्ही सीसीटीव्हीही पाहिलं. दोन्ही आरोपी पायधुनीतून दादरला आले होते. दादर स्टेशनवर जीआरपींनी ही केस पायधुनीकडे वर्ग केली. अर्शद याची हत्या शिवजीत सिंग आणि प्रवीण चावडा यांनी का केली? याचा तपास आता स्थानिक पोलीस करत आहेत. " असंही ऋषीकुमार यांनी एबीपी माझाला सांगितलं. शिवजीतला उल्हासनगरहून अटक ही घटना उघडकीस आल्यानंतर शिवजीत सिंह हा दादर स्थानकातून पळून गेला होता. पोलिसांनी प्रवीण चावडाकडून त्याची माहिती घेतली आणि त्यानंतर त्याचा माग काढत त्याला उल्हासनगरहून अटक केली. खुनासाठी वापरण्यात आलेलं हत्यारही पोलिसांनी जप्त केलं आहे. या प्रकरणी आता दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे