अनिश पाटील

हप्ते वसुली, सोने-चांदीच्या तस्करी असे धंदे करणारे मुंबईचे अधोविश्व कालांतराने अमली पदार्थाच्या तस्करीत शिरले. त्यात दाऊद टोळीचा हात धरण्याएवढे कोणी मोठे नव्हते. दाऊदचा अमलीपदार्थाचा व्यवहार पाहणाऱ्या इकबाल मिर्चीकडे हजारो कोटींची मालमत्ता होती. त्यावरून ही उलाढाल किती मोठी होती, याचा प्रत्यय येतो. एकटय़ा मुंबईत मिर्चीची बेनामी ५०० कोटींची मालमत्ता होती त्यावरून दाऊदची स्वत:ची मालमत्ता किती असावी याचा अंदाजच करता येऊ शकतो.

story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

लंडनमध्ये मिर्चीच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी मुंबईच्या अमलीपदार्थ तस्करीत कैलाश राजपूत हे नाव चर्चेत आले. एअर कार्गोमध्ये लपवून आठ कोटी रुपयांच्या इफेड्रिनची ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने नुकतीच कैलाश राजपूतचा हस्तक अली असगर परवेझ आगा शिराजी याला अटक केली. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. तो श्रीनगरला पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथक श्रीनगरला रवाना झाले. त्याचा माग काढत पोलीस पथक दिल्लीलाही गेले होते. पण तो सापडला नाही. अखेर त्याच्याविरोधात ‘लुक आऊट सक्र्युलर’ जारी करण्यात आले होते. तो दुबईला जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र मुंबई विमानतळ प्राधिकरणाने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणातील ही महत्त्वाची अटक आहे. या टोळीचा म्होरक्या कैलाश राजपूत असून त्याच्यानंतर टोळीत शिराजी दुसऱ्या क्रमांकावर होता. या प्रकरणात १५ मार्च रोजी झालेल्या अटकेपूर्वी सहा महिन्यांच्या कालावधीत या टोळीने ७२ वेळा अमलीपदार्थ परदेशात पाठवल्याचा गुन्हे शाखेला संशय आहे. याप्रकरणी शिराजीव्यतिरिक्त सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

गुन्हे शाखेने १५ मार्च रोजी अंधेरी परिसरात छापा टाकून १५ किलो ७४० ग्रॅम केटामाईन व २३ हजारांहून अधिक वायग्राची पाकिटे जप्त केली होती. केटामाईनची किंमत सात कोटी ८७ लाख रुपये, तर वायग्राची किंमत ५८ लाख रुपये होती. याप्रकरणी आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही टोळी युरोपीयन देशासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका व दुबईमध्येही अमलीपदार्थ व प्रतिबंधक गोळय़ांची तस्करी करीत होती. या टोळीचे हस्तक विविध देशांमध्ये सक्रिय आहेत. अमलीपदार्थाची निर्मिती करून ते मुंबईत एकत्र आणण्यात येत होते. त्यानंतर त्याचे वितरण करण्यात येत होते. कैलास राजपूत या टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थ तस्कर कैलाश राजपूतसह तीन एलओसी जारी केले आहेत. संपूर्ण तस्करी राजपूतच्या इशाऱ्यावर करण्यात आली आहे. राजपूतविरोधात देशभरात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस याप्रकरणी इतर पोलीस व यंत्रणांकडून मदत घेत आहेत. तसेच देशभरात या टोळीसाठी कोण काम करीत आहे याची माहितीही मागवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. कैलास राजपूतचे जाळे जगभर पसरले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसह एनसीबी, सीबीआय, डीआरआय, दिल्ली पोलीस त्याच्या मागावर आहेत. कैलाशला ब्रिटनमध्ये पकडण्यात आल्याच्या चर्चा आहेत. पण कैलाश हा आजही सक्रिय असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. कुरिअर कंपन्यांमध्ये त्याचे चांगले नेटवर्क आहे. कैलास राजपूतचा संबंध मेक्सिको आणि कोलंबियाच्या अमलीपदार्थ तस्करांशी आहे. तो बनावट पारपत्रांच्या मदतीने दुबई, जर्मनी, लंडन या ठिकाणी नियमित जात असतो. त्याने दिल्ली, मुंबईसह देशातील मोठय़ा शहरांमध्ये अमलीपदार्थाचे मोठे जाळे पसरवले आहे.