मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील (सीएसएमटी) रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) कोठडीत मध्य प्रदेशातील खंडवा येथील इमरान शेख (३५) याचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आली आहे. कोठडीत झालेल्या मृत्यूचे गांभीर्य लक्षात घेऊन सीआयडीच्या कोकण परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी इमरान रोजगाराच्या शोधात मुंबईत आला होता. तो २० सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे १०.१८ वाजता सीएसएमटी येथील आरपीएफ चौकीत गेला आणि त्याने खंडव्याला जाणाऱ्या रेल्वेबाबत चौकशी केली. त्यावेळी तेथे वाद झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, वादानंतर आरपीएफ कर्मचाऱ्यांनी इमरानला मारहाण केली आणि जखमी अवस्थेत कोठडीत ठेवले. दुसरीकडे, मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाची वागणूक असामान्य होती. काही जण आपला जीव घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे तो सांगत होता. त्यानंतर त्याने आक्रमक होत आरपीएफचे उपनिरीक्षक अनिकेत यांना मारहाण केली. त्यामुळे त्याला इजा होऊ नये म्हणून आरपीएफ जवानांनी त्याला ताब्यात घेतले आणि जीआरपीला माहिती दिली. त्यानंतर जीआरपीचे पाच कर्मचारी आरपीएफ चौकीत दाखल झाले.
इमरानच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणात आरपीएफच्या कार्यपद्धतीबाबत नातेवाईकांनी गंभीर आरोप केले असून, दुसरीकडे अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. सीआयडीच्या तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि घटनाक्रम स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
शौचालयात बेशुद्ध अवस्थेत आढळला
दुपारी सुमारे १२.३० वाजता इमरानला शौचालयात जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र सुमारे दहा मिनिटे तो बाहेर न आल्याने दरवाजा उघडण्यात आला असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यानंतर त्याला तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अहवाल नोंदवला असून मृतदेहाचे जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
सीसीटीव्ही तपास आणि तिकिटांचा धागा
तपासादरम्यान स्थानक परिसर आणि आरपीएफ कार्यालयातील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या तपासात संबंधित तरुण पहाटेपासून सीएसएमटी परिसरात फिरत असल्याचे समोर आले आहे. त्याने रेल्वे पोलीस ठाणे आणि मदत कक्षालाही भेट दिली होती. सीसीटीव्ही चित्रीकरण सीआयडीच्या ताब्यात देण्यात आले असून त्याची सखोल छाननी सुरू आहे. इमरानकडे खंडवा – दादर आणि दादर – सीएसएमटीची अनारक्षित रेल्वे तिकिटे आढळली. त्याच्या मुंबईतील हालचालींचाही मागोवा घेतला जात आहे.
