मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वे क्रमांक १२२६१ सीएसएमटी – हावडा एक्स्प्रेसच्या रिकाम्या रेकमधील पॅन्ट्री कारला बुधवारी पहाटे ३.४० च्या सुमारास अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन काही मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. रेक रिकामा असल्याने मोठी दुर्घटना टळली असून, कोणालाही दुखापत झाली नाही.
सीएसएमटी यार्डमध्ये गाडी क्रमांक १२२६१ चा रिकामा रेक उभा असताना पॅन्ट्री कार क्रमांक एससीआर/१९२९६७ मध्ये पहाटे ३.४० च्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती संबंधित विभागाच्या रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला तातडीने कळविण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान पहाटे ४.०१ वाजता घटनास्थळी दाखल झाले. पथकाने तातडीने आग विझविण्याची कार्यवाही सुरू केली. अवघ्या चार मिनिटांत, म्हणजे पहाटे ४.०५ वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात आले.
आगीचा रेकमधील अन्य डब्यांना फटका बसू नये यासाठीही खबरदारी घेण्यात आली. रेक रिकामा असल्याने मोठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, पॅन्ट्री कारला नेमक्या कोणत्या कारणामुळे आग लागली, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. आग कशी लागली याचा रेल्वे प्रशासन तपास करीत आहे. आगीमुळे पॅन्ट्री कारचे नेमके किती नुकसान झाले, याचीही पाहणी करण्यात येत आहे. या रेकमध्ये प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, या घटनेमुळे रेल्वेच्या यार्ड परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गाडी क्रमांक १७४१२ महालक्ष्मी एक्स्प्रेस २८ जुलै २०२६ पहाटे ५.४० वाजता ठाकूरवाडी येथे आली असता, बी वन डब्यातील विद्युत पॅनेलमध्ये उंदरामुळे शॉर्टसर्किट झाले. धूर येऊ लागल्याने अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता, डब्याला आग लागली नसल्याचे निदर्शनास आले. तसेच, पॅनेलमध्ये उंदीर मृतावस्थेत आढळला. या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. तसेच कोणतेही नुकसान झाले नाही. आवश्यक तपासणी आणि दुरुस्तीनंतर सकाळी ६ वाजता महालक्ष्मी एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना केली होती.
