भूलथापा देऊन बँकेचा तपशील मिळवून पैसे हडप करणे, डिजिटल ॲरेस्टची भीती दाखवून डल्ला, ऑनलाइन खरेदीत गंडा, विवाह जुळणी संकेतस्थळावर खोटे तपशील देऊन फसवणूक, चुकीची लिंक पाठवून मोबाइल हॅक करणे… अशा प्रकारच्या अनेक सायबर गुन्ह्याचे प्रमाण मुंबईत वाढले आहे. मुंबई पोलीस दलाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट या अवघ्या आठ महिन्यांत मुंबईत ४,२५४ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मात्र या गुन्ह्यांपैकी केवळ १८२ प्रकरणांची उकल करण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे.
मुंबई पोलिसांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि बँक फसवणुकीशी संबंधित १,०२० गुन्हे या आठ महिन्यांत दाखल झाले आहेत. म्हणजेच एकूण नोंदवलेल्या सायबर गुन्ह्यांपैकी २५ टक्के गुन्हे हे ऑनलाइन बँकिंग आणि कार्ड फसवणुकीचे आहेत. याशिवाय, घरबसल्या सोप्या कामांमधून मोठी कमाई करण्याचे आमिष दाखवणे, शेअर बाजार व क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणुकीवर अवाजवी परताव्याची आश्वासने देणे, तसेच तोतया अधिकारी बनून भीती दाखवून नागरिकांकडून डिजिटल पद्धतीने पैसे उकळणे यांसारख्या विविध प्रकारांचा वापर सायबर भामट्यांकडून केला जात आहे.
बहुतांशी प्रकरणांत ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. बँक तसेच पेटीएम अधिकारी असल्याचे सांगून केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली एक लिंक पाठवून अथवा डेबिट क्रेडिट कार्ड बाबत सर्व तपशील मागवून खात्यातील रकमेवर डल्ला मारण्यात येत असल्याच्या घटना नोंद करण्यात आल्या आहेत.
तपासातीन आव्हाने बिकट
वाढत्या ऑनलाइन व्यवहारांमुळे सर्वसामान्य नागरिक, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिक सहजपणे या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत. मात्र गुन्ह्यांची नोंद मोठ्या प्रमाणावर होत असली तरी त्यांच्या तपासातील आव्हाने अत्यंत बिकट आहेत. सायबर भामटे हे सहसा इतर राज्यांतून किंवा परदेशातून बनावट सिमकार्ड, बँक खाती आणि व्हच्र्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा वापर करून हे गुन्हे घडवून आणतात. यामुळे तांत्रिक पुरावे गोळा करून संशयितांपर्यंत पोहोचणे कठीण ठरते. याच कारणामुळे यंदा केवळ १८२ प्रकरणांची उकल करण्यात तपास यंत्रणांना यश आले असून आतापर्यंत १०४ जणांना अटक झाली आहे.
दक्षता बाळगण्याचे आवाहन
सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या धोक्यापासून नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे. अनोळखी व्यक्तींशी ओटीपी, सीव्हीव्ही किंवा बँकेचे गोपनीय पासवर्ड शेअर करू नयेत, कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले.
मुंबईत गेल्या आठ महिन्यांत ४,२५४ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मात्र त्यापैकी केवळ १८२ गुन्ह्यांची उकल करण्यात तपास यंत्रणांना यश आले.
गुन्हे किती?
* शेअर बाजार गुंतवणूक फसवणूक : ३०२
* इतर गुंतवणूक फसवणूक : १५६
* सरकारी अधिकारी / डिजिटल ॲरेस्ट भासवून फसवणूक : ९५
* नोकरी संबंधित फसवणूक : ७७
* बनावट वेबसाइट फसवणूक : ७६
* ऑनलाइन खरेदी फसवणूक: ५२
* कर्ज फसवणूक : ४२
* कस्टम/गिफ्ट फसवणूक : २६
* क्रिप्टोकरन्सी फसवणूक : १४
* जानेवारी ते ऑगस्ट २०२६- ४,२५४
* जानेवारी ते ऑगस्ट २०२५- २,९४८
* गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४४ टक्क्यांहून अधिक वाढ
