मुंबई: शेअर बाजारात उच्च परताव्याचे आमिष दाखवून भारतीय नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱया आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारांच्या दोन प्रमुख यंत्रणांवर मुंबई पोलिसांच्या पश्चिम प्रादेशिक विभाग सायबर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. कंबोडियातील भामट्यांना ‘ओटीपी फार्मिंग’ द्वारे बनावट व्हॉट्सअॅप खाती पुरवणारे तीन आणि फसवणुकीची रक्कम वळवण्यासाठी भाड्याची बँक खाती पुरवणारे चार, अशा एकूण सात आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. या दोन वेगवेगळ्या कारवाईत मिळून २ कोटी ११ लाख ५५ हजार रुपयांच्या फसवणुकीचा उलगडा झाला आहे.
पहिल्या कारवाईत, एका नागरिकाची २२ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते. कंबोडियातील सायबर भामटा भारतीय व्हॉट्सअॅप क्रमांकांवरून गुंतवणूकदारांशी संपर्क साधत असे. दिल्लीतून प्रमोद कुमार उर्फ विपिन, धर्मेंद्र गुप्ता आणि राजीव कुमार गुप्ता (पीओएस एजंट) ही टोळी साध्या कीपॅड मोबाईलद्वारे ‘ओटीपी फार्मिंग’ चे जाळे चालवत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. नागरिकांच्या नकळत त्यांच्या नावे सिमकार्ड सुरू करून व्हॉट्सअॅप सुरू केले जायचे आणि त्याचे ओटीपी कंबोडियातील मुख्य सूत्रधारांना टेलिग्राम खाते विकले जात होते. या छाप्यात पोलिसांनी ६६९ सिमकार्ड, १०० मोबाईल फोन, १२० बॅटऱ्या आणि बायोमेट्रिक फिंगरप्रिंट स्कॅनर जप्त केले.
दुसऱ्या कारवाईत, ‘नाम एएमसी एचएनडब्ल्यू’ या बनावट ट्रेडिंग अॅपद्वारे आणि ‘७८६-विस्डम लाँच क्लब’ या ग्रुपद्वारे एका नागरिकाची १ कोटी ८९ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. तपासादरम्यान पोलिसांनी नवी मुंबई व पुण्यातून विठ्ठल वाघमोडे (३६,रा. इंदापूर), रमेश लवंगारे (४९,रा.कामोठे), नानासाहेब पारखे (३३, रा.कळंबोली) आणि अमोल कुंभार (३९, रा.कामोठे) यांना अटक केली. आरोपींनी बँक ऑफ इंडियामध्ये बनावट खाती उघडून ती सायबर भामट्यांना वापरण्यास दिली होती. खात्यावर पैसे जमा होताच ते स्वतःच्या खात्यांत वळवून वाटून घेत असत. या कारवाईत पोलिसांनी ९ लाख ८६ हजार ४०० रुपयांची रोकड जप्त केली असून सायबर पोर्टलवरून २८ लाख ५६ हजार रुपयांची रक्कम वेळेत गोठवली आहे.
ही एकत्रित कारवाई पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे आणि सहाय्यक आयुक्त सुवर्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पूनम जाधव, अंजली वाणी आणि पथकाने पार पाडली.
‘ओटीपी फार्मिंग’ म्हणजे काय?
बनावट किंवा अवैध सिमकार्डचा वापर करून मोठ्या प्रमाणावर ओ.टी.पी. तयार करणे आणि ते परदेशी व आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारांना विकणे.
