मुंबई: मुंबईतील विलेपार्ले येथे सायबर फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तेथील ८२ वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाला दूरसंचार विभाग, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि दिल्ली पोलीस दलातील अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या सायबर भामट्यांनी तब्बल १ कोटी ८ लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप
तक्रारदार ८२ वर्षांचे असून ते विलेपार्ले येथे राहतात. त्यांना ३० सप्टेंबर २०२५ रोजी एका व्यक्तीचा व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्याने आपली ओळख दिल्लीतील दूरसंचार विभागातील अधिकारी पवन कुमार अशी सांगितली. तक्रारदार यांच्या आधार कार्डचा गैरवापर करून एक बनावट बँक खाते उघडले असून त्याद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा दावा त्या व्यक्तीने केला. यामुळे तक्रारदार घाबरले. यानंतर त्यांना खुशी शर्मा (दिल्ली पोलीस उपनिरीक्षक) आणि हेमराज कोहली (सीबीआय अधिकारी) अशी स्वतःची ओळख सांगणाऱ्या व्यक्तींकडून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आले. नवी दिल्ली येथील कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल झाल्याचे आणि त्यांचा आधार क्रमांक अवैध आर्थिक व्यवहारांशी जोडला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.
अटकेची भीती घालून १ कोटी ८ लाख उकळले
सायबर भामट्यांनी तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात लवकरच अटक वॉरंट जारी केले जाईल, अशी धमकी दिली. त्यानंतर निकासाचा दाखला (क्लियरन्स सर्टिफिकेट) मिळवून देण्यासाठी त्यांच्या सर्व बँक खात्यांचे आणि बचतीचे तपशील देण्याची मागणी केली. केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करत त्यांनी पीडित वृद्धाला, पडताळणीसाठी आपली सर्व रक्कम एका सुरक्षित बँक खात्यात वळवावी लागेल, असे सांगितले. या धमक्यांमुळे घाबरलेल्या वृद्धाने त्यांच्या आणि पत्नीच्या बँक खात्यांमधून भामट्यांनी दिलेल्या खात्यांमध्ये एकूण एक कोटी आठ लाख रुपये इतकी रक्कम हस्तांतरित केली. या काळात सायबर भामट्यांनी व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे सतत संपर्क साधत ही बाब कोणालाही न सांगण्यासाठी बजावले. मुलांना देखील ही बाब समजल्यास त्यांनाही अटक करण्याची धमकी दिली.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
यानंतर तक्रारदार वृद्धाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात फसवणूक, तोतयागिरी आणि फौजदारी कट रचल्याबद्दल भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी आणि हस्तांतरित झालेल्या पैशांचा स्त्रोत शोधण्यासाठी पोलिसांनी आरोपींच्या मोबाइल क्रमांक आणि बँक खात्यांच्या तपशिलांवरून तपास सुरू केला आहे. सरकारी किंवा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी असल्याचे भासवून अनोळखी कॉल करणाऱ्यांशी कोणतीही वैयक्तिक किंवा बँक माहिती शेअर करू नका, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना एकदा केले आहे.
