मुंबई : देशभरात सायबर फसवणुकीने कहर गाठला असून या मार्गातून मिळालेल्या पैशातून आरोपींकडून मोठ्या प्रमाणात सोनेखरेदी होत असल्याची बाब तपासादरम्यान स्पष्ट झाली आहे. फसवणुकीचे पैसे मिळविण्यासाठी इतरांची बँक खाती वापरल्यानंतर त्याद्वारे मिळालेल्या रोख रकमेद्वारे मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यात आल्याचा प्रकार मुंबई पोलिसांच्या दक्षिण प्रादेशिक सायबर विभागाने उघड केला आहे. या निमित्ताने सायबर फसवणुकीचा वेगळा प्रकारही उघडकीस आला आहे.

दक्षिण मुंबईतील एका कंपनीतील लेखापालाला मालकाचे छायाचित्र असलेल्या व्हॉटस अॅप क्रमांकावरुन संदेश आला. आपण व्यस्त असल्यामुळे तातडीने वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यात यावेत, असे या संदेशात म्हटले होते. त्यानुसार सदर लेखापालाने कंपनीच्या बँक खात्यातून ६३ व्यवहारांद्वारे सुमारे दहा कोटी ४० लाख रुपये वेगवेगळ्या खात्यात पाठवले. मात्र सदर बनावट ओळखीद्वारे सायबर फसवणुकीचा नवा अवतार समोर आला.

या प्रकरणी दक्षिण प्रादेशिक सायबर विभागाचे वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार भोपाळे, निरीक्षक सुरेश भोये यांच्या पथकाने तपास केल्यानंतर या फसवणुकीचे धागेदोरे राज्यासह बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली येथे असल्याचे आढळले. फसवणुकीच्या रकमेपैकी सुमारे पाच कोटी ६३ लाख रुपये रोखण्यात पथकाला यश आले आहे. उर्वरित पैसे मात्र आरोपींनी वेगवेगळ्या खात्यातून काढल्याचे स्पष्ट झाले. यापैकी काही रक्कम मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यासाठी वापरण्यात आले. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली तसेच राज्यातील नामांकित ज्वेलर्सकडून सोने खरेदी केल्याचेही तपासात उघड झाले आहे.

जालना येथील ज्ञानेश्वर ठोके याच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी पाच जणांना बिहार व दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले. ठोकेच्या खात्यात ३१ लाख रुपये जमा झाले होते. आपण डेबिट कार्ड, चेकबुक, पासबुक एका व्यक्तीला दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. उर्वरित पाच आरोपींनीही तीच पद्धत वापरली होती. यापैकी एका आरोपीने बँक खात्यात आलेल्या पैशातून सोने खरेदी करुन मुख्य सूत्रधाराला दिले होते. या सूत्रधाराचा पोलीस शोध घेत आहेत.

या प्रकरणी बिरेंद्रकुमार भगत (२६), रंजनकुमार खरवार (४१) या बिहारमधील तर विकास बिंद, वंश मनोचा आणि फैय्याज शब्बीर हुसेन आलम या २२ वर्षे वयाच्या दिल्लीतील तरुणांना तिहार तुरुंगातून ताब्यात घेण्यात आले आहे. सायबर फसवणुकीसाठी या तरुणांनी आपली बँक खाती वापरण्यास दिली होती, असे तपासात स्पष्ट झाले आहे.