Mumbai Dabbawala and Charmakar Community Houses in City : मुंबईतील डबेवाले आणि चर्मकार समाजाबांधवांसाठी राज्य सरकारने १२ हजार घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आज (१३ सप्टेंबर) विकासक आणि शासनामार्फत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. यातून डबेवाल्यांचे ६० वर्षांपासूनचे स्वप्न येत्या ३ वर्षांत साकार होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस यांनी यासंदर्भातील विधानसभेत आश्वासन दिलं होतं, त्याची यानिमित्ताने पूर्तता होणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिधीगृहात आयोजित एका कार्यक्रमात हा सामंजस्य करार केला गेला. त्यानंतर फडणवीसांनी उपस्थितांना संबोधित करताना डबेवाले व चर्मकारांना शुभवार्ता दिला.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ही घरं बांधली जाणार असून म्हाडाने यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रियांका होम्स रियालिटी या प्रकल्पासाठी ३० एकर जागा देणार असून, नमन बिल्डर ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर घरांचं बांधकाम करणार आहेत. यातून १२ हजार घरांची निर्मिती होणार असून, ती घरं डबेवाले व चर्मकार समाजातील बांधवांसाठी उपलब्ध होणार आहेत.

हे ही वाचा >> धारावीत लवकरच पाच नमुना सदनिका; पात्र रहिवाशांसह अपात्र, पात्र लाभार्थींना घरांविषयी माहिती

घराची किंमत किती असणार?

डबेवाले व चर्मकार समाजातील लोकांना अवघ्या २५ लाख रुपयांमध्ये प्रत्येकी ५०० चौरस फूट आकाराचे घर दिले जाणार आहे. डबेवाले आणि चर्मकार बंधूंचं स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न हे येत्या ३ वर्षांत पूर्ण होणार आहे.

हे ही वाचा >> २० टक्क्यांतील घरांच्या वाढीव किमतीवर नियंत्रण! प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

आपले डबेवाले जागतिक पातळीवर ख्यातीप्राप्त आहेत. वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांनी कधीही सोडलेला नाही. आपले तत्त्व आणि निष्ठा त्यांनी कधीही ढळू दिल्या नाहीत, म्हणूनच ते व्यवस्थापनातील अतिशय उत्कृष्ट मॉडेल आहे. या घरांसाठी राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा >> Yamini Jadhav Burka Distribution: शिवसेना शिंदे गटाच्या बुरखावाटपामुळे महायुतीत वादाची ठिणगी? आशिष शेलारांनी केली टीका

सह्याद्री अतिथीगृहातून फडणवीसांची घोषणा

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला नमन बिल्डरचे जयेश शाह, प्रियांका होम्स रियालिटीचे रुद्रप्रताप त्रिपाठी, श्रीकांत भारतीय, डबेवाला संघटनेचे उल्हास मुके, चर्मकार निवारा असोसिएशनचे अशोक गायकवाड महाराज उपस्थित होते.