माळीण गावावर कोसळलेल्या दु:खाच्या डोंगरातून गावकऱयांना सावरता यावे यासाठी आता मुंबईचे डबेवाल्यांकडूनही मदतीचा हात सरसावला आहे. गावकऱयांना यशाशक्ती आर्थिक मदत करण्याचे आवाहन मुंबईचे डबेवाले करणार आहेत. विशेष म्हणजे, हे आवाहन चिठ्ठ्यांच्या माध्यमातून करण्यात येणार असून डबेवाले आपल्या ग्राहकांच्या डब्यासोबत माळीण गावकऱयांना मदत करण्याचे आवाहन करणारी चिठ्ठी पोच करणार आहेत.
शनिवारी मुंबईतील तब्बल २ लाख ग्राहकांना जेवणाच्या डब्यासोबत  माळीणला मदतीच्या आवाहनाची चिठ्ठी मुंबईचे डबेवाले देणार आहेत. त्याचबरोबर मुंबईच्या अंधेरी येथील डबेवाला गोविंधा पथक यंदा दहिहंडी फोडून जमणाऱया रकमेपैकी बहुतांश रक्कम माळीण गावातील बाळगोपाळांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे.
याआधी मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून देखील माळीण गावाच्या पुनर्वसनासाठी ५० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.