मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील विविध कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांना जेवणाचे डबे पोहोचविण्याचे काम करणारे ”मुंबईचे डबेवाले” ३० मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत सुटीवर जाणार आहेत. ग्रामदेवतेच्या उत्सवानिमित्त ही सुटी घेत असल्याचे मुंबई डबेवाला असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे. या कालावधीत ग्राहकांनी पगार कापू नये, अशी मागणी डबेवाल्यांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील नोकरदारांना अखंडपणे जेवणाचा डबा पोहोचवण्याचे काम मुंबईतील डबेवाले करत आहेत. हे डबेवाले मुख्यतः मुळशी, मावळ, आंबेगाव, जुन्नर, खेड, अकोला, संगमनेर भागातल्या गावांमधले आहेत. गावी असलेल्या जत्रा, कुलदैवताची पूजा, धार्मिक कार्य, कुलाचार आणि शेतीच्या मशागतीची कामांसाठी दरवर्षी डबेवाले सुट्टी घेऊन गावी जात असतात. या गावांमध्ये आता ग्रामदेवतेची यात्रा सुरू होणार असून यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी डबेवाल्यांनी सहा दिवसांची सुट्टी घेतली आहे.
मुंबईतल्या अनेक नोकरदारांचे दुपारचे जेवण डबेवाल्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे ३० मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत अनेक नोकरदारांची गैरसोय होणार असून याबाबत मुंबई डबेवाला असोसिएशनने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच, या सहा दिवसांच्या कालावधीतला पगार न कापण्याची विनंती डबेवाला असोसिएशनने केली आहे. तसेच, सुटीचा कालावधी संपल्यानंतर ५ एप्रिल रोजी पुन्हा कामावर रुजू होतील.
