मुंबई : दादरमधील प्लाझा येथे ८ जून रोजी झालेल्या बेस्टच्या ताफ्यातील भाडेतत्वावरील विद्युत बसच्या अपघाताचा अंतिम सविस्तर अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र विद्युत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने महत्त्वाच्या सुरक्षा प्रणालींची तपासणी करणे अशक्य असल्याचे ताडदेव आरटीओने आपल्या अहवालात नमुद केले आहे. तसेच तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला का याचा शोध घेण्यासाठी बस उत्पादक कंपनीने सविस्तर तपासणी करण्याची शिफारस अहवालात केली आहे.
वीर कोतवाल उद्यानाजवळ बेस्टच्या विद्युत बसचा अपघात झाला होता. बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे बसने एका ट्रेलरला, त्यानंतर मोटारगाडी, दुचाकी आणि पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली होती. या अपघातामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर तीन जण जखमी झाले होते. या अपघाताचा अंतिम सविस्तर चौकशी अहवाल अद्याप आलेला नाही. ताडदेव आरटीओच्या मोटार वाहन निरीक्षकांनी तयार केलेल्या तपासणी अहवालात, एफआयआर क्रमांक २८३/२०२६ मध्ये ओलेक्ट्राच्या वातानुकूलित विद्युत बसची
तपासणी करण्यात आली. बसमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम बसवली असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र अपघातात बसचे मोठे नुकसान झाल्याने ब्रेकिंग सिस्टीम किंवा एबीएस या दोन्हींची चाचणी करता आली नाही. अहवालात चालकाची केबिन, स्टिअरिंग लिंकेज, डॅशबोर्ड, पुढचा दरवाजा, ईसीयू वायरिंग, इलेक्ट्रिकल हार्नेस, फ्यूज बॉक्स, आयटीएमएस, विंडशील्ड आणि इतर महत्त्वाच्या भागांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वाहन रस्त्यावर चालवण्यायोग्य स्थितीत नसल्यामुळे निरीक्षकांना बसची रोड टेस्ट घेता आली नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे, ‘अपघाताचे कारण’ या शीर्षकाखालील अहवालात ‘मत देता येत नाही’ असे नमूद केले आहे. तांत्रिक बिघाडाने अपघात झाला का हे निश्चित करण्यासाठी उत्पादकाने किंवा बसच्या अधिकृत विक्रेत्याने सविस्तर विद्युत आणि यांत्रिक तपासणी करावी, अशी शिफारस ताडदेव आरटीओने केली आहे.
आरटीओचा अहवाल पोलीस तपासासाठी सादर केलेल्या सविस्तर अपघात अहवालाचा एक भाग आहे. बस अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी ‘बेस्ट’ उपक्रमाने चार सदस्यीय समिती नेमली होती.बसच्या ब्रेक किंवा इतर यंत्रणेत कोणताही तांत्रिक दोष नव्हता. हा अपघात चालकाच्या चुकीमुळेच झाला, असा निष्कर्ष ताडदेव आरटीओच्या प्राथमिक अहवालात नमुद करण्यात आला होता.
