मुंबई : राजकीय आयोजकांकडून दरवर्षी वाढविल्या जाणाऱ्या बक्षीसांच्या घसघशीत रक्कमेसोबत दहिहंडीचे थर वाढत असताना या पारंपरिक उत्सवाची सांस्कृतिक पातळी घसरत चालल्याचे चित्र आहे. दहिहंडीला मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांच्या सामुहिक, शिस्तबद्ध सादरीकरणाचा साहसी क्रीडा प्रकार म्हणून राज्य सरकारने मान्यता दिली आहे. परंतु, उत्तान नृत्यक्रीडा आणि डान्सबारसदृश सादरीकरणांच्या झाकोळीने या खेळाचा नायक गोविंदाच हरवून गेल्याचे यंदाच्या उत्सवात प्रकर्षाने दिसून आले.
गोविंदांच्या साहसाचा, सामूहिकतेचा आणि शिस्तीचा उत्सव असलेल्या दहीहंडीला मोठ्या, खासकरून राजकीय आयोजकांनी आधीच गर्दी खेचणाऱ्या ‘इव्हेंट’चे स्वरूप दिले आहे. डीजेचा दणदणाट, उत्तान नृत्य, झगमगाट आणि राजकीय शक्तिप्रदर्शन यात या सणाचे पावित्र्य लयाला गेले आहे. त्यात आता तीन-चार महिने शिस्तबद्ध सराव करून मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचा पराक्रमही या सगळ्या झगमगाटाआड अंतर्धान पावण्याच्या मार्गावर आहे.
यंदाच्या दहिहंडीत तर अशा उत्तर भारतीय ‘हुडदंग’सदृश(धुडगूस) नृत्यांच्या सादरीकरणाने कळस गाठला होता. अवाजवी अंगविक्षेपांमुळे किळसवाण्या म्हणाव्या अशा ‘थरा’ला ही सादरीकरणे गेली होती. राजकीय व्यासपीठांवर दिवसाढवळ्या झालेल्या या मनोरंजन कार्यक्रमांची संभावना समाजमाध्यमांवर ‘राजरोसपणे चालणारी डान्सबार’ म्हणून केली गेली. महाराष्ट्राच्या, त्यातही मुंबई-ठाणे परिसरातील एक व्यवच्छेदक ओळख बनलेल्या या सणाच्या अधोगतीविरोधात आता गोविंदा मंडळेच एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.
यंदा मुंबई-ठाणे परिसरात नऊ थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांची संख्या मोठी होती. काही ठिकाणी दहा थरांचा विक्रम गाठण्याची स्पर्धा रंगली. गोविंदा पथकांच्या या कौशल्यामागे महिनोन्महिने चालणारा सराव, शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना आणि प्रचंड शिस्त असते. मात्र, व्यासपीठावरील मनोरंजनाच्या कार्यक्रमांना मिळणारा वाढता वेळ आणि महत्त्व यामुळे गोविंदा पथकांनाच ताटकळत उभे राहावे लागत असल्याची खंत महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच गोविंदा मंडळांनी ‘लोकसत्ताकडे व्यक्त केली. मुंबई आणि परिसरातील सुमारे दीड हजार गोविंदा मंडळे संघटनेशी संलग्न आहेत.
काही वर्षांपूर्वी मोठे सेलिब्रिटी व्यासपीठावर येणार असल्याने गोविंदा पथकाला उभारलेले थर उतरवण्यास सांगण्यात आल्याची आठवणही एका गोविंदाने सांगितली. ‘त्या दिवशी गोविंदा हा खरा नायक असतो. मात्र त्यालाच दुय्यम वागणूक मिळाली,’ अशी खंत त्याने व्यक्त केली.
दहीहंडीचे व्यावसायिकीकरण नवे नाही. मोठमोठी बक्षिसे, प्रायोजक, सेलिब्रिटींची उपस्थिती आणि राजकीय नेत्यांची हजेरी यामुळे मुंबई-ठाण्यातील दहीहंड्यांना गेल्या काही वर्षांत मोठे स्वरूप आले आहे. यंदाही विविध ठिकाणी लाखो रुपयांच्या बक्षिसांची घोषणा, कलाकारांचे कार्यक्रम आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती यामुळे उत्सवाचे स्वरूप अधिकाधिक भव्य झाले. मात्र, या भव्यतेबरोबर उत्सवाच्या सांस्कृतिक आशयाचे काय, हा प्रश्न एका महिला गोविंदाने उपस्थित केला.
दहीहंडी ही केवळ मनोरंजनाची संधी नसून महाराष्ट्राची लोकपरंपरा आहे. गोविंदांच्या मानवी मनोऱ्यात सामूहिकता, साहस, समन्वय आणि शिस्त यांचा संगम दिसतो. राज्यानेही दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकार म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे या उत्सवाचे केंद्र गोविंदा आणि त्याची सुरक्षितता असायला हवे. त्याऐवजी मंचावरील उथळ मनोरंजनाला महत्त्व मिळत असेल, तर उत्सवाच्या मूळ आशयावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते.
मनोरंजन सुरू असताना गोविंदा ताटकळत
‘गोविंदांना अशा प्रकारची उत्तान नृत्ये आवडतात हे कुणी ठरविले? ही मुले तीन-तीन महिने सराव करतात. शिस्तबद्धपणे मानवी मनोरे बांधून दहीहंडी फोडण्याचे कसब दाखविण्यात त्यांना रस असतो. अशा प्रकारचे नृत्याचे कार्यक्रम ठेवू नका, असे आयोजकांना सांगून आम्ही दमलो आहोत. गर्दी खेचण्याच्या आयोजकांच्या चढाओढीत खरा गोविंदा हरवून जात आहे. व्यासपीठावर मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू असताना अनेकदा गोविंदा मंडळे ताटकळत उभी राहतात. मंडळांची गर्दी वाढत जाते,’ अशी खंत व्यक्त करणारी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा संघटनेचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी दिली.
सीमारेषाही हव्यात
‘गोविंदा टपोरींचा सण समजला जायचा. पण, हा समज चुकीचा असून अनेक काही गोविंदा मंडळे सामाजिक आणि स्वयंसेवी कामे करतात. अनेक मंडळे बक्षिसाची रक्कम गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सवातील उपक्रमांसाठी वापरतात. दहिहंडीच्या निमित्ताने होणारे मनोरंजनाचे कार्यक्रम प्रबोधन करणारे असावेत. सणांमधील संस्कृती जपली गेली पाहिजे आणि सीमारेषा पाळल्या पाहिजेत,’ अशी अपेक्षा संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेंद्र पांचाळ यांनी व्यक्त केली. राजकीय पक्ष आणि नेते दहीहंडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क साधत असतात. त्यामुळे या उत्सवाला महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे स्वरूप देण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
समाजमाध्यमांवर टीकास्त्र
दहीहंडीतील आक्षेपार्ह सादरीकरणांवर समाजमाध्यमांवरही अनेकांनी टिकास्त्र सोडले. डोंबिवलीसारख्या शहरांमध्ये रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा आणि वाहतूककोंडीचे प्रश्न कायम असताना उत्सवाच्या भव्य आयोजनावर होणारा खर्च चर्चेचा विषय ठरला. प्रश्न दहीहंडी साजरी करण्याचा नसून शहराच्या आणि समाजाच्या प्राधान्यक्रमांचा आहे. मूलभूत सुविधांसाठी निधीची कमतरता जाणवत असताना उत्सवाच्या झगमगाटासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा आणि संसाधने उपलब्ध होतात, ही विसंगती खटकणारी आहे, असल्याचे मत व्यक्त होत होते.
