लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : मुंबई, ठाण्यासह आजुबाजूच्या परिसरात शनिवारी मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्सव साजरा झाला. मात्र, उत्सवात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोविंदांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. दिवसभरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १८,८१८ जणांना इ-चलान जारी करण्यात आले. या माध्यमातून १ कोटी ९२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. यात सर्वाधिक ३,२४९ विनाहेल्मेट चालकांवर कारवाई करण्यात आली.
शहरात विविध ठिकाणी अनेक गोविंदा पथकांनी उंच मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडल्या. यावेळी ही गोविंदा पथके दुचाकीसह इतर वाहनांनी प्रवास करीत होते. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी स्थानिक पोलिसांसह मुंबई वाहतूक पोलीस रस्त्यावर तैनात होते. वाहतुकीत अडथळा आणणे, हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे व वाहतुकीचे नियम न पाळणे या गुन्ह्यांत वाहतूक पोलिसांनी गोविंदावर कारवाई केली.
रस्ता सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली. वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली. तीन हजार ७२७ इ-चलान बजावण्यात आले. बेदरकार व असुरक्षित वाहन चालवणे, एकाच दुचाकीवर तिघांनी प्रवास करणे, मद्यपान करून वाहन चालवणे व विरुद्ध दिशेने वाहन चालवण्यासह विविध उल्लंघनांसाठी १८ हजार ८१८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
कारवाईचा तपशील
इ-चलान
वाहतुकीला अडथळा
३,७२७
विना हेल्मेट
३,२४९
सिग्नल तोडणे
१,४७८
विरुद्ध दिशेने वाहन चालविणे
७३४
प्रवेशबंदी/एकमार्गी रस्त्यावर वाहन
४७६
दुचाकीवर तिघांचा प्रवास
३०१
मद्यपान करून वाहन चालवणे
२५
मुलुंड परिसरात दहीहंडीवरून परतणाऱ्या गोविंदा पथकांना वाहतूक पोलिसांनी मार्गावरोधक (बॅरिकेड्स) लावून अडवले. विनाहेल्मेट दुचाकी चालवणे व एका दुचाकीवर तिघांचा प्रवास केल्याप्रकरणी पोलिसांनी गोविंदांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाई दरम्यान काही ठिकाणी गोविंदा व पोलिसांमध्ये वाद झडले. गेल्या वर्षीच्या कारवाईत वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांची पायमल्ली केलेल्या १०,०५१ गोविंदांवर कारवाई करत १ कोटी १३ लाख ५७ हजार २५० रुपयांचा दंड आकारला होता.
