मुंबई : गोविंदा रे गोपाळा…, तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा… अशा घोषणा देत, बेन्जो, कच्छीबाजा, ढोल – ताशाच्या गजरात मुंबईतील ठिकठिकाणची गोविंदा पथके गोपाळकाल्यानिमित्त शनिवारी सकाळपासून मार्गस्थ होऊ लागली. ठिकठिकाणी मानाच्या दहीहंड्या फोडत पथके मोठ्या बक्षिसांच्या आमिषापोटी मुंबईत फिरत होती. त्याच वेळी मनाई असतानाही १४ वर्षांखालील मुला-मुलींचा थरामध्ये समावेश करून मोठ्या रकमेचे पारितोषिक मिळविण्यासाठी दहीहंड्या फोडण्याचा प्रयत्न पथके करीत होती. त्याच वेळी मालाडमधील मालवणी परिसरात चिकुवाडी येथे दहीहंडी बांधलेला वीटांचा खांब कोसळून जखमी झालेल्या सात वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू झाल्याने दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले. त्याचबरोबर ठिकठिकाणी थर कोसळून ११८ गोविंदा जखमी झाले.
मुंबईसह राज्यामध्ये शुक्रवारी मध्यरात्री कृष्णजन्माष्टी साजरी झाली. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता ठिकठिकाणी दहीहंडी फोडून गोविंदा पथकांनी जन्माष्टमी साजरी केली. गोपाळकाल्यानिमित्त शुक्रवारी सकाळपासून गोविंदा पथके बेन्जो, कच्छीबाजा, ढोल-ताशाच्या गजरात आपल्या परिसरातील मानाची दहीहंडी फोडून मार्गस्त होत होती. ठाण्यात अनेक ठिकाणी बांधलेल्या मोठ्या बक्षिसांच्या दहीहंड्यांकडे मुंबईतील बहुसंख्य गोविंदा पथके आकर्षित होऊन मार्गस्थ होत होते. परिणामी, दुपारनंतर मुंबईमधील गोविंदाचा उत्साह कमी होऊ लागला. मुंबईत काही मोजक्याच ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात पथकांची गर्दी झाली होती.
आठ-नऊ थर रचणाऱ्या गोविंदा पथकांच्या पावलावर पाऊल ठेऊन अनेक लहान पथके उंच थर रचण्याचा अट्टाहास करीत होते. त्याचबरोबर बहुसंख्य पथकांनी बंदी असतानाही १४ वर्षांखालील मुलांचा थरामध्ये वापर करण्यात येत होता. मात्र पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत होते. गोविंदा पथके उत्सवात मग्न असतानाच मालाडमधील मालवणी परिसरातील चिकुवाडी येथील सात आठ फूट उंचीवर बांधलेली दहीहंडी फोडताना अचानक हंडीची दोरी बांधलेला विटांचा खांब कोसळला. दहीहंडी फोडण्यासाठी थरावर चढलेल्या रुद्र कदम याच्या अंगावर खांब कोसळला. या दुर्घटनेत रुद्र गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच महापालिका कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुद्रला तातडीने मालवणी जनरल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी जाहीर केले.
ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी रचलेले थर कोसळून सायंकाळी ६.३० पर्यंत ११८ गोविंदा जखमी झाले. मुंबई शहरातील ८३, पूर्व उपनगरांतील २१, तर पश्चिम उपनगरांतील १४ गोविंदांचा त्यात समावेश आहे. जखमी गोविंदांना तातडीने केईएम, नायर, शीव, राजावाडी, हिंदुजा, पोदारसह अन्य रुग्णालयांमध्ये नेण्यात आले. यापैकी पाच गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ८० गोविंदांवर उपचार सुरू होते. तसेच उपचार केल्यानंतर ३३ गोविंदांना घरी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
