मुंबईतील २००० सालापर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याचा निर्णय राज्यसरकारने जाहीर केल्यानंतर शहरातील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांच्या अभिनंदपर जाहिराती झळकू लागल्या होत्या. मुंबईतील झोपडपट्टीवासियांना हक्काचे घर मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलल्याबद्दल स्थानिक वृत्तपत्रांनी कामत यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला होता. गुरूदास कामत यांची गांधी घराण्याशी असणारी जवळीक आणि काँग्रेस पक्षाबद्दलच्या कामत यांच्या एकनिष्ठतेचे या वृत्तपत्रांमधून भरभरून कौतूक करण्यात आले होते. मात्र  या जाहिराती म्हणजे ‘पेड न्यूज’चा प्रकार असल्याचे सर्वत्र बोलले जात होते. तसेच या जाहिराती प्रसिद्ध करणा-या काही वृत्तपत्रांच्या मालकांनीसुद्धा हा ‘पेड न्यूज’चा प्रकार असल्याचे खाजगीत मान्य केले आहे. मात्र, याविषयी गुरूदास कामत यांना विचारणा करण्यात आली असता आपण अशाप्रकारे कोणतीही पेड न्यूड दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात माझ्यावर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे असल्याचे कामत यांनी सांगितले. माझे काही मित्र आणि हितचिंतकांनी मी आजवर केलेल्या कामाची प्रशंसा केल्याच्या बातम्यांना काही वृत्तपत्रांनी स्व:तहून प्रसिद्धी दिली असून याच्याशी ‘पेड न्यूज’चा संबंध नसल्याचे गुरूदास कामत यांनी स्पष्ट केले आहे.