मुंबई : जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील पाणीसाठा ४१ टक्क्यांवर गेला आहे. तसेच मुंबईच्या हद्दीतील विहार आणि तुळशी हे दोन्ही तलाव १०० टक्के भरले आहेत. धरणातील पाणीसाठा वाढलेला असला तरी पाणी कपात कायमच राहणार असल्याचेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या सात धरणांत बुधवारी ४१.३६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील पाणीसाठा साडेसहा टक्क्यांपर्यंत कमी झाला होता. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली. सात धरणांपैकी मुंबईच्या हद्दीतील विहार आणि तुळशी हे दोन्ही तलाव १०० टक्के भरल्यामुळे ओसंडून वाहू लागले. मुंबईत होत असलेल्या दमदार पावसामुळे मंगळवार, ७ जुलैला रात्री ९ वाजता विहार तलाव ओसंडून वाहू लागला, आणि त्या पाठोपाठ रात्री ११.४३ च्या सुमारास तुळशी तलावही ओसंडून वाहू लागला.
यंदा पावसाळा लांबल्याने हा पाणीसाठा अधिकाधिक दिवस टिकविण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर आहे. त्यामुळे पाणीसाठ्याच्या नियोजनाकरीता पालिका प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मुंबईत आधीच १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. तसेच, पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी पिण्याव्यतिरिक्त इतर वापरावरही १७ जून २०२६ पासून मर्यादा घालण्यात आल्या आहेत. बांधकामांना व जलतरण तलावांना दिलेल्या जलजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. तसेच औद्योगिक व व्यापारी तसेच स्पोर्टस् क्लब आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. पाणीसाठा वाढलेला असला तरी पाणी कपात पुढील काही दिवस राहणार असल्याचे पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मंगळवारी स्पष्ट केले होते.
एक टक्का पाणी तीन दिवस पुरते…
धरणांच्या पाणीसाठ्यात एक टक्का वाढ होते तेव्हा ते पाणी तीन दिवस पुरते. ३० सप्टेंबरपर्यंत जर धरणे १०० टक्के भरली, तरच तो पाणीसाठा पुढच्या मे किंवा जूनपर्यंत अथवा पाऊस सुरू होईपर्यंत पुरतो. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती पाहून निर्णय घेतला जातील अशी माहिती आश्विनी भिडे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.
अल निनोचा प्रभाव पुढेही राहणार
यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस उशीरा सुरू झाला. या अल निनोचा प्रभाव संपूर्ण पावसाळ्यात दिसणार आहे. त्यामुळेच गेल्या दोन – तीन दिवसांत खूप मोठा पाऊस पडला. पण आता पुढे बरेच दिवस पाऊस ओढ देणार आहे. त्यानंतर काही कालावधीने मोठा पाऊस येईल. त्यामुळे हे विचारात घेता पाण्याच्या साठ्याचे नियोजन करावे लागणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.
तुळशी तलावाविषयी
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी तुळशी सर्वात लहान तलाव आहे. हा तलाव १८७९ मध्ये ४० लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता. या तलावाची क्षमता ८०४.६ कोटी लिटर अर्थात ८०४६ दशलक्ष लिटर आहे. या तलावातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लिटर (१.८ कोटी लिटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते. तुळशी तलावातून ओसंडून वाहणारे पाणी विहार तलावाला जाऊन मिळते
विहार तलावाविषयी…
या तलावाचे बांधकाम १८५९ मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये एवढा खर्च आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र सुमारे १८.९६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ सुमारे ७.२६ चौरस किलोमीटर एवढे असते. तलावाची पाणीसाठा क्षमता २७,६९८ दशलक्ष लिटर अर्थात २,७६९.८० कोटी लिटर इतकी आहे. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर त्यातील पाणी मिठी नदीला जाऊन मिळते.
