मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने मोठ्या प्रतीक्षेनंतर दमदार हजेरी लावली आहे. केवळ दोन दिवसात धरणांच्या पाणीसाठ्यात एकूण ७.५१ टक्क्यांची वाढ झाली आहे. दोन दिवसांत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन हजार मिमिहून अधिक पाऊस बरसल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, धरणांकडे पावसाने पाठ फिरवल्याने मुंबईकर व प्रशासनाची वाढलेली चिंता देखील काही प्रमाणात कमी झाली आहे.

मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी ४००० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र यंदा पावसाने धरणांच्या पाणलोट क्षेत्राकडे ओढ दिली होती. जुलै उजाडला तरीही धरणांत पावसाने हजेरी लावली नव्हती. मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असला तरीही धरणे कोरडी असल्याने प्रशासनासह नागरिकांची डोकेदुखी वाढली होती. मात्र, शनिवारपासून पावसाने मुंबईसह धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार हजेरी लावली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. शनिवार, ४ जुलै रोजी धरणांत ९.४१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, शनिवार आणि रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत ७.५१ टक्क्यांची वाढ झाली आहे. सद्यस्थितीत सातही धरणांचा एकूण जलसाठा १६.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. ५ जुलै रोजी धरणांमध्ये मिळून एकूण १००२ मिमी, तर ६ जुलै रोजी १०३५ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी १३.१९ टक्क्यांवर असलेल्या पाणीसाठा सोमवारी १६.९२ टक्क्यांवर पोहोचला असून तुळशी आणि भातसा तलाव ८० टक्क्यांहून अधिक भरले आहे. उर्ध्व वैतरणा धरणाच्या परिसरात मात्र अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

कोणत्या धरणात किती साठा

सद्यस्थितीत उर्ध्व वैतरणामध्ये ४.९९ टक्के, मोडकसागरमध्ये ३०.९६ टक्के, तानसामध्ये १७.३४ टक्के, मध्य वैतरणामध्ये १८.३५ टक्के, भातसामध्ये १४.१२ टक्के, विहारमध्ये ९०.६१, तर तुळशीमध्ये ८२.१४ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा जरी कमी असला, तरीही सध्याच्या परिस्थितीनुसार मुंबईकर व प्रशासनासाठी ही बाब मोठी दिलासादायक आहे.

तीन वर्षातील पाणीसाठा

वर्ष पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

६ जुलै २०२६ – २४४९०० (१६.९२ टक्के) ६ जुलै २०२५ – ८६२०९८ (५९.५६ टक्के) ६ जुलै २०१४

– १५७४४८ (१०.८८ टक्के)

दोन दिवसातील धरणातील पावसाची नोंद

उर्ध्व वैतरणा – ९९ मिमी मोडकसागर – १८३ मिमी तानसा – २३४ मिमी मध्य वैतरणा – १७३ मिमी भातसा – २५२ मिमी विहार – ४८८ मिमी तुळशी – ६०८ मिमी