मुंबई : यंदा संपूर्ण जून महिना पावसाने ओढ दिल्याने धरणांनी तळ गाठला होता. मात्र, जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने दिलासादायक स्थिती निर्माण केली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात सद्यस्थितीत ८९.८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून यंदा प्रथमच रविवारी गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठ्याची नोंद झाली. यंदा ४ जुलै रोजी धरणात ९ टक्के पाणीसाठा असताना गतवर्षी त्याच दिवशी धरणे तब्बल ५०. ७५ टक्के भरली होती. जुलैच्या शेवटच्या दिवसांमधील मुसळधार पावसाने अखेर ही तफावत दूर केली.

मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या सात धरणांतून दरदिवशी सुमारे ४००० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. या सातही धरणांची मिळून एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर इतकी पाणी साठवण क्षमता आहे. सद्यस्थितीत धरणांमध्ये मिळून एकूण १२ लाख ८९ हजार २८९ दशलक्ष लिटर म्हणजेच ८९.०८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

यंदा एल निनोच्या संकटाची चाहूल आणि पावसाने दडी मारल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली होती. अशातच धरणांनी तळ गाठल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने १५ मे पासून १० टक्के पाणीकपात लागू केली. संपूर्ण जून सरला तरीही पावसाचे आगमन झाले नव्हते. अखेर जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली. मात्र त्यांनतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने पुन्हा पावसाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र जुलैच्या पंधरवड्यानंतर धरणांच्या पाणलोट पुन्हा दमदार पाऊस सुरू झाला.

जुलैच्या अखेरच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठ्याची नोंद झाली. गतवर्षी २ ऑगस्ट रोजी धरणांतील एकूण पाणीसाठा ८८.९४ टक्के होता. यंदा त्याच दिवशी, म्हणजे रविवारी, पाणीसाठा ८९.०८ टक्क्यांवर पोहोचला. दोन्ही वर्षांतील ही वाढ अल्प असली तरी यंदा जून महिन्यात निर्माण झालेली गंभीर पाणीटंचाईची स्थिती आणि त्यानंतर जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ही बाब विशेष लक्षणीय ठरते.

गतवर्षी २७ जून रोजी सातही धरणात ३७.१६ टक्के पाणीसाठयाची नोंद झाली होती. यंदा त्या दिवशी धरणात केवळ ७.३१ टक्के पाणी शिल्लक होते. ४ जुलै रोजी ९.४१ टक्के पाणीसाठा पोहोचला. मात्र, गतवर्षी त्या दिवशी धरणे ५०.७५ टक्के भरली होती. तसेच, यंदा ५० टक्के धरणे भरली, त्या दिवशी म्हणजेच १८ जुलै २०२५ रोजी तब्बल ८१.४७ टक्के पाणीसाठयाची नोंद झाली होती. या प्रचंड तफावतीमुळे मुंबईकरांसह प्रशासनाचीही पाणीचिंता वाढली होती. मात्र, जुलैच्या पंधरवड्यानंतर पावसाने अधिक जोर धरल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला. रविवारी सातही धरणात ८९.०८ टक्के पाण्याची नोंद झाली.

तीन वर्षातील २ ऑगस्ट रोजीचा पाणीसाठा वर्ष – पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये) २०२६ – १२८९२८९ (८९.०८ टक्के) २०२५ – १२८७२१३ (८८.९४ टक्के) २०२४ – ११६४४०५ (८०.४५ टक्के) चार धरणे काठोकाठ विहार’ तलाव ७ जुलै रोजी रात्री ९ च्या सुमारास ओसंडून वाहू लागला होता. त्या पाठोपाठ लगेच त्याच दिवशी म्हणजेच ७ जुलै रोजी रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी ‘तुळशी’ तलाव देखील ओसंडून वाहू लागला होता. त्यानंतर २२ जुलै रोजी सकाळी ९ च्या सुमारास तानसा तलाव, तर गुरुवारी मोडकसागर तलाव ओसंडून वाहू लागले.