मुंबई: मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाची पाणी साठवण क्षमता कमी पडू लागली असल्यामुळे या धरणातील गाळ काढण्यात यावा अशी मागणी मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांनी केली आहे. भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी ही मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी सातही धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस मुंबईसाठी कमी पडू लागला आहे. पावसाळ्यात धरणे काठोकाठ भरली तरी हे पाणी मुंबईकरांना वर्षभर पुरत नाही.

त्यामुळे दरवर्षी मे महिना आला की धरणे तळ गाठू लागतात. मुंबईतील वाढती लोकसंख्या हे एक कारण असले तरी धरणात गाळ साठल्यामुळे धरणांची साठवण क्षमता कमी होत असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे धरणातील गाळ काढण्याची मागणी वेळोवेळी होत असते. यावेळी भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी ठरावाच्या सूचनेद्वारे धरणातील गाळ काढण्याची मागणी केली आहे.

भाजपचे नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी आपल्या ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिकेमार्फत दरवर्षी मोठे नाले, मिठी नदी, इत्यादींमधील गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यादरम्यान आणि पावसाळ्यानंतर अशा टप्प्याटप्प्याने करण्यात येते. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये डोंगरदऱ्यांमधून वाहून येणाऱ्या पाण्यासोबत माती, पालापाचोळा, कचरा वाहत येतो.

परिणामी, धरणांतील पाणी साठवण्याची क्षमता कमी होत आहे. त्यामुळे, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबई शहराला पुरेसा पाणीपुरवठा करणे महानगरपालिकेला कठीण होते आणि ह्याकरिता मुंबई शहरासाठी नवीन धरणांचे बांधकाम करणे हीदेखील खूपच खर्चिक बाब आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांतील गाळ पावसाळ्यापूर्वी किमान पाच ते दहा वर्षांतून एकदा काढावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

काँग्रेसच्या नगरसेविका आएशा वनू यांनीही अशीच मागणी केली आहे. त्यांनी आपल्या ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे की, मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व तलावांचे वैज्ञानिक पद्धतीने सर्वेक्षण करून तलावांमधील गाळ टप्प्याटप्प्याने वेळबद्ध कार्यक्रम आखून काढण्यात यावा. धरणात गाळ साचू नये म्हणून, पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवून, तृतीय पक्षामार्फत गाळ काढण्याच्या कामाची तपासणी करून आणि आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करून गाळ काढण्यात यावा,अशी मागणी वनू यांनी केली आहे.