मुंबई : मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू झाली असून मुंबई महानगरपालिकेसह सर्वज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आगमनापासून विसर्जनापर्यंतच्या नियोजनात व्यस्त आहेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा मुंबईमधील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबईतील काही धोकादायक पुलांवरून गणेश आगमन – विसर्जनाच्या मिरवणुका जात असून तेथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची वर्दळ होते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने धोकादायक पुलांची पाहणी, दुरुस्ती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्या, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.
मुंबईमधील करी रोड, साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी, एल्फिन्स्टन, केनेडी, फॉकलंड, भायखळा, मरिन लाईन, लोकमान्य टिऱ्स, दादर आदी ठिकाणच्या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या पुलांवर गणेश भक्तांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. विशेष म्हणजे लालबागचा राजा, राजाराम गल्ली, गणेश गल्ली, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आदी प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका या मार्गावरून जातात. परिणामी, या पुलांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशा परिस्थितीत पुलांची संरचनात्मक सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी आगमन – विसर्जन मिरवणुकांच्या मार्गातील सर्वच पुलांची संरचनात्मक तपासणी करावी. आवश्यकतेनुसार पुलांवर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
महापालिकेने यासंदर्भात तातडीने एक बैठक आयोजित करावी आणि महानगरपालिकेचे संबंधित विभाग, रेल्वे प्रशासन, वाहतूक पोलीस आणि गणेशोत्सव समन्वय समितीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी विनंती ॲड. दहिबावकर यांनी पत्रात केली आहे.
