मुंबई : चेंबूर दुर्घटनेत ११ वर्षीय चिमुकल्याचा झाड पडून नाहक बळी गेल्याच्या घटनेला आठवडा होण्यापूर्वीच मुंबईत झाड पडून आणखी दोन मृत्यू झाल्याच्या घटना रविवारी घडल्या. आठवडाभरात तीन जणांचा झाड पडून बळी गेल्याने मुंबईतील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कुर्ला येथील नौपाडा परिसरात रविवारी दुपारी एका दुकानावर भलेमोठे झाड पडून ६३ वर्षीय युनूस कुंडावाला यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त होत असतानाच शनिवारी डोक्यात झाड पडल्याने गंभीर जखमी झालेल्या कुमार हसन रझा जहांगीर आलम सय्यद (१८) याची उपचारादरम्यान रविवारी प्राणज्योत मालवली. झाड पडून मृत्यु होण्याच्या घटनांमुळे धोकादायक झाडांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर मुंबईतील सर्व झाडांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी यंत्रणांना दिले होते. मात्र, चेंबूर दुर्घटनेनंतर केवळ चार दिवसांतच ४ जुलै रोजी गोरेगाव येथील युनिट नंबर १३ वर झाड पडून मोठी दुर्घटना घडली. दुपारी रस्त्यावरून जात असताना चालत्या दुचाकीवर झाडाची मोठी फांदी पडून १८ वर्षीय कुमार हसन रझा जहांगीर आलम सय्यद गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने मालाड येथील बालाजी रुग्णालयात नेण्यात आले होते.
ही घटना ताजी असतानाच रविवारी कुर्ला येथील नौपाडा परिसरात एका दुकानावर भलेमोठे झाड पडल्याची घटना घडली. त्या दुर्घटनेत युनूस कुंडावाला (६३) यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर कुंडावाला यांना उपचारासाठी फौजिया रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कुंडावाला यांच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त होत असतानाच कुमार हसन रझा याची रविवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. तसेच, रविवारी गोरेगाव येथील मोहन गोखले मार्गावर एका रिक्षावर झाड पडून त्यात दीपक माळी (२८) ही व्यक्ती अडकली होती. दुर्घटनेत जखमी झालेल्या माळी यांस उपचारासाठी एचबीटी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान,२ जुलै रोजी सांताक्रुझ येथे झाड पडून आठ कामगार जखमी झाले होते. त्यापूर्वी१० मे रोजी खार पश्चिमेतील लिंकिंग रोडवर बांधकाम स्थळावरील एक मोठे झाड कोसळून रिक्षावर आदळल्याने दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या. या दुर्घटनेत १४ वर्षीय आरिका श्रीवास्तव हिचा मृत्यू झाला होता. तसेच, हर्षिता कुमार (२३) गंभीर जखमी झाली होती.
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने तब्बल १ लाख ६२ हजार ६७६ झाडांचे सर्वेक्षण केले. तसेच १ लाख ३ हजार झाडांची छाटणी करण्यात आली. तर ६४८ धोकादायक झाडे काढून टाकण्यात आली. मात्र, असे असले तरीही शहरात झाडे, फांद्या पडण्याच्या घटनांना आळा बसलेला नाही. एका आठवडाभरात झाड पडून तीन निष्पाप जीव गेल्याने पालिकेच्या वृक्षछाटणीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मृत युनूस कुंडावाला यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर
कुर्ल्यातील दुर्घटनेची माहिती मिळताच महापौर रितू तावडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि दुर्घटनेचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, मृत युनूस कुंडावाला यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत तावडे यांनी जाहीर केली. त्यानंतर, स्थानिकांच्या भावना आणि तक्रारी समजून घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. कुर्ला आणि आसपासच्या परिसरासह मुंबईतील झाडांचे तात्काळ सर्वेक्षण करून आवश्यक तिथे झाडांच्या छाटणीची कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले. नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा आश्वासन त्यांनी रहिवाशांना दिले.
पडझडीने मुंबईकर धास्तावले
शनिवारी सायंकाळी ५ ते रविवारी सायंकाळी ५ या २४ तासांच्या कालावधीत मुंबईत सुमारे १५० ते १७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुंबई शहर विभागात १५३ मिलीमीटर, पूर्व उपनगरात १२१ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरांमध्ये सरासरी ९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच, रविवारी दुपारी ३.२२ च्या सुमारास समुद्राला ४.१९ मीटर उंचीची भरती होती. ताशी ७२ ते ७५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. शहरात रविवारी तब्बल ११६ ठिकाणी झाड, फांद्या पडल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या. तसेच पूर्व उपनगरात ८२, तर पश्चिम उपनगरात ८४ अशा एकूण २०३ ठिकाणी झाडे, फांद्या पडल्या. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला. शिवाय शहरात ६, पूर्व व पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक अशा आठ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. तसेच,१५ ठिकाणी घराचा, भिंतीचा भाग पडल्याच्या तक्रारी पालिकेच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्या.
