आता पर्यटकांना हेलिकॉप्टरने मुंबई दर्शन करता येणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘मुंबई दर्शन बाय एअर’ या नावाने सुरू ही सेवा सुरू करण्यात आली. आयआरसीटीसीतर्फे सुरू करण्यात आलेल्या या अस्विमरणीय हवाई सफारीचा आनंद घेण्यासाठी लोकांना ५,५८० इतके शुल्क मोजावे लागणार आहे. त्यानूसार, जुहू येथून या हवाई सफरीला सुरूवात होईल. सध्या हेलिकॉप्टर सफरीमध्ये दोन पॅकेजेस उपलब्ध असून प्रत्येक फेरी १५ मिनिटांची असेल. त्यापैकी दक्षिण मुंबईची फेरी दर मंगळवारी आणि शुक्रवारी असेल. यामध्ये जुहू, वांद्रा-वरळी सी लिंक, हाजी अली असा परतीचा प्रवास असेल, तर उत्तर मुंबईची फेरी दर सोमवारी आणि शनिवारी असेल. यामध्ये जुहू, वर्सोवा, मालाड, गोराई आणि एस्सेल वर्ल्डपर्यंतचा परतीचा प्रवास अंतर्भूत आहे. भविष्यात उत्तम प्रतिसाद मिळाल्यास या फेऱ्या वाढवण्याचा आयआरसीटीसीचा मानस आहे. ही हवाई सफर काहीशी महागडी जरी असली तरी, या माध्यमातून पर्यटकांना पहिल्यांदाच मुंबईचे विहंगम दृश्य पाहता येणार आहे.