मुंबई : ॲन्टॉप हिल येथे एका जुन्या मोटरगाडीत दोन चिमुकल्यांचे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत्यू झालेले दोघे भाऊ-बहीण असून ते बेपत्ता झाल्याची तक्रार बुधवारी ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मोटरगाडीत गुदमरून मुलांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. चिमुकल्यांच्या मृत्युमुळे परिसरात शोकाकुल वातावरण आहे.

साजीद शेख (७) व मुस्कान (५) अशी या मुलांची नावे आहेत. वडील मोहाब्बत शेख व आई मुस्कान यांच्यासोबत ते ॲन्टॉप हिल परिसरात वास्तव्यास होते. ते दोघे बुधवारी दुपारी एकत्र खेळण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र बराच वेळ झाला तरी ते घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला. मुले कुठेच न सापडल्याने अखेर त्यांच्या आई – वडिलांनी ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मुले बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मुले बेपत्ता झाल्याची तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ त्यांचा शोध सुरू केला. मुले राहात असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासून आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यात आला. मात्र मुले कोठेच सापडली नाहीत. अखेर सायंकाळी ७.४५ च्या सुमारास एका महिला पोलिसाने मोबाइलमधील टॉर्चच्या साह्याने जुन्या मोटरगाडीत पाहिले असता आत मुले असल्याचे आढळले. मोटरगाडीचा दरवाजा उघडला असता मुले बेशुद्धावस्थेत आढळली. त्यांना तातडीने शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पोलीस मुलांच्या शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा – मुंबई : नवीन परीक्षा भवनात छायांकित प्रत केंद्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ

हेही वाचा – मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक

प्राथमिक माहितीनुसार दोन्ही मुलांचा मृत्यू गुदमरून झाल्याची शक्यता असल्याचे उपायुक्त (परिमंडळ-४) प्रशांत कदम यांनी सांगितले. चौकशीनुसार दोन्ही मुले दुपारी २ च्या सुमारास खेळायला घराबाहेर पडली. तेव्हापासून ती बेपत्ता होती. ती जुनी मोटरगाडी मुलांच्या घरापासून ५० फुटांच्या अंतरावर आहे. ती मुले नेहमी त्याच परिसरात खेळायची. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तपासणीतही त्या काळात तेथे कोणी तिसरा व्यक्ती आलेला दिसत नाही. तरी पोलीस सर्व शक्यता पडताळणून पाहत आहेत. याप्रकरणी ॲन्टॉप हिल पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.