मुंबई : मुंबई ते दिल्ली इंडिगो विमानाला रविवारी रात्री ४५ मिनिटे विलंब झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. इंडिगोचे ६ ई १०३ विमान रात्री साडे नऊ वाजता मुंबई विमानतळावरून दिल्लीकरिता उड्डाण करणार होते. मात्र, विमानाला विलंब झाला. त्यातच ऐनवेळी विमानाचे (बोर्डिंग गेट) प्रवेशद्वार बदलण्यात आल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली.
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी म्हूणन ‘इंडिगो’ची ओळख आहे. सर्वात जास्त देशांतर्गत उड्डाणांमध्ये इंडिगो कंपनी अग्रस्थानी आहे. रविवारी रात्री टर्मिनल दोन वरून इंडिगो हवाई कंपनीचे विमान दिल्ली करिता रवाना होणार होते. परंतु, मुंबईत सुरू असलेला पाऊस व वातावरणात बदल झाल्यामुळे विमानाला उड्डाण भरण्यास विलंब झाला. त्याच वेळी अचानक (बोर्डिंग गेट) प्रवेशद्वार बदलण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. काहींना स्वत:बरोबरचे प्रवास सामान आणि लहान मुलांना घेऊन धावपळ करावी लागली.
इंडिगोने विमानाला विलंब का होत आहे, याबाबत संबंधित यंत्रणांकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली न गेल्याने प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली.
