मुंबई : देशातील मुंबई-दिल्ली हा सर्वाधिक वर्दळीचा, फायदेशीर व जगातील व्यग्र हवाई मार्गांपैकी एक आहे. या मार्गावर इंडिगो व एअर इंडियामध्ये चुरस आहे. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान आसन क्षमतेच्या बाबतीत इंडिगोने एअर इंडिया समूहाला केवळ ०.९ टक्क्यांनी मागे टाकत आघाडी घेतली. तर, अकासा एअरने या मार्गावर आघाडी घेत तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळविले.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तर दिल्ली राजधानी आहे. व्यावसायिक व सरकारी कामांसाठी दररोज हजारो प्रवासी या मार्गावर प्रवास करतात. या मार्गावर दररोज शंभरहून अधिक विमानांची जे-जा सुरू असते. एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान मुंबई-दिल्ली मार्गावर इंडिगोची ८ लाख ९२ हजार १९० आसने उपलब्ध होती. त्यामुळे आसन क्षमतेत इंडिगोचा वाटा ४२.८ टक्के आहे. त्याच्या तुलनेत एअर इंडिया समूहाने, एअर इंडिया व एअर इंडिया एक्स्प्रेससह ८ लाख ७३ हजार ९७० आसने उपलब्ध केली.
यामुळे या समूहाचा वाटा ४१.९ टक्के आहे. म्हणजेच दोन्ही कंपन्यांमध्ये आसन क्षमतेच्या बाबतीत अत्यंत कमी फरक आहे. आसन संख्येत इंडिगो आघाडीवर असली, तरी विमानांच्या फेऱ्यांच्या संख्येत एअर इंडिया समूहाने बाजी मारली. एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान एअर इंडिया समूहाने विमानाच्या ४,७६८ फेऱ्या, तर इंडिगोने ४,०५६ फेऱ्या केल्या. इंडिगोची विमान तुलनेने अधिक आसन क्षमतेची असल्याने कमी फेऱ्यांमध्ये कंपनीने अधिक आसने दिली.
इतर हवाई मार्गाच्या तुलनेत सर्वाधिक आसन क्षमता
देशातील इतर अनेक प्रमुख हवाई मार्गांवर सध्या आसन क्षमता कमी होत आहे. मुंबई-दिल्ली मार्गावर मात्र वेगळे चित्र आहे. सप्टेंबरमध्ये या मार्गावरील आसन क्षमता वर्षभराच्या तुलनेत १३.९ टक्क्यांनी वाढून ६ लाख ७७ हजार ३०० झाली. देशातील कोणत्याही हवाई मार्गासाठी सप्टेंबरमधील ही सर्वाधिक आसन क्षमता आहे.
इंडिगो व एअर इंडिया समूहामधील आसन क्षमतेचा फरक – ०.९ टक्के
मुंबई-दिल्ली मार्गावर सप्टेंबरमध्ये आसन क्षमतेत वार्षिक वाढ – १३.९ टक्के
अकासा तिसरी
गेल्या वर्षी मुंबई-दिल्ली मार्गावरील एकूण आसन क्षमतेत अकासाचा वाटा सुमारे ६ टक्के होता. यंदा हा आकडा वाढून १०.७ टक्क्यांवर पोहोचला आहे. स्पाइस जेटला मागे टाकत ”अकासा” या मार्गावरील तिसरी मोठी विमान विमान कंपनी ठरली. स्पाइस जेटचा आसन क्षमतेतील वाटा यंदा केवळ ४.४ टक्के होता.
