मुंबई : गुंतवणूकदाराच्या डिमॅट खात्याचा अनधिकृत ताबा मिळवून त्यातील ४ कोटी ५८ लाख रुपयांचे शेअर्स परस्पर विक्री केल्यानंतर त्यातून मिळालेल्या रकमेतून अत्यल्प बाजारमूल्य असलेले १ कोटी ७१ लाख रुपयांचे शेअर्स खरेदी करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी एका महिलेला ३ नोव्हेंबर रोजी अटक केली. विशेष म्हणजे, संबंधित महिलेचा यापूर्वीही अशाच प्रकारच्या चार गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

ही घटना १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत घडली. अज्ञात व्यक्तीने इंटरनेटच्या माध्यमातून तक्रारदाराच्या डिमॅट खात्यात त्यांच्या परवानगीशिवाय प्रवेश मिळविला. त्यासाठी तक्रारदाराचा युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करण्यात आला. त्यानंतर डिमॅट खात्यातील एकूण ४ कोटी ५८ लाख ३४ हजार ५७९ रुपये मूल्याचे शेअर्स विकण्यात आले. या व्यवहारातून मिळालेल्या रकमेतून १ कोटी ७१ लाख ६० हजार ३२ रुपये मूल्याचे अत्यल्प बाजारमूल्य असलेले पेनी स्टॉक खरेदी करण्यात आले. त्यामुळे तक्रारदाराच्या गुंतवणुकीचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

या प्रकाराची माहिती मिळताच तक्रारदाराने दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारदाराचे शेअर्स विक्री झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून २ कोटी ८६ लाख ७४ हजार ५४७ रुपये मूल्याचे शेअर्स गोठविले.

तपासादरम्यान आरोपींनी डिमॅट खात्यात प्रवेश मिळविण्यासाठी तक्रारदाराच्या ई-मेल खात्याचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. ई-मेल खात्याचा प्रवेश मिळविण्यासाठी त्याच्याशी संलग्न असलेल्या मोबाइल क्रमांकाचे अनधिकृतरीत्या सिमकार्ड मिळविण्यात आले होते. त्याच्या आधारे ई-मेल खात्याचा ताबा मिळवून डिमॅट खात्यात प्रवेश करण्यात आला. त्यानंतर तक्रारदाराच्या परवानगीशिवाय त्यांचे मूळ शेअर्स विकून त्या बदल्यात कमी किंमतीचे पेनी स्टॉक खरेदी करण्यात आले.

या प्रकरणातील संशयित महिलेची ओळख पटवून पोलिसांनी ३ नोव्हेंबर रोजी तिला अटक केली. तिच्या पूर्वीच्या गुन्हेगारी इतिहासाची तपासणी केली असता सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील दोन, आझाद मैदान पोलीस ठाण्यातील एक आणि अंधेरी पोलीस ठाण्यातील एका अशा एकूण चार समान स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये तिच्याविरुद्ध कारवाई झाल्याचे समोर आले. त्यामुळे डिमॅट खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश करून शेअर्सची परस्पर विक्री करण्याच्या प्रकारात तिचा सहभाग असल्याच्या दृष्टीने तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, नागरिकांनी अनोळखी मोबाइल क्रमांकांवरून आलेल्या लिंक किंवा ॲपच्या माध्यमातून शेअर बाजारात व्यवहार करू नयेत. संशयास्पद व्यवहार आढळल्यास १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे पोलिसांनी आवाहन केले.