मुंबई : डेंग्यू, लेप्टो आजारांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विविध उपाययाेजना करण्यात येत आहेत. मात्र मागील सहा वर्षांपासून या आजारांच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे डेंग्यू व चिकुनगुनियाला प्रतिबंध करण्यात मुंबई महानगरपालिकेला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, २०२१ पासून डेंग्यू व चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मुंबईमध्ये २०२१ मध्ये ८७६ रुग्ण सापडले होते. २०२२ मध्ये रुग्णांची संख्या १ हजार १२३ वर पोहचली. मात्र त्यानंतर २०२३ ते २०२५ या तीन वर्षांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या पाच हजारांहून अधिक आहे. २०२३ मध्ये ५ हजार ५८६ रुग्ण, २०२४ मध्ये ५ हजार ९०६ आणि २०२५ मध्ये ५ हजार ९९४ रुग्ण सापडले. २०२६ मध्ये जुलैपर्यंत १ हजार २२७ रुग्ण सापडले आहेत. मात्र पावसाळ्यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असून पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबईमध्ये चिकुनगुनियाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळत आहेत. मात्र २०२१ पासून चिकुनगुनियाच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. मुंबईमध्ये २०२१ मध्ये ८० रुग्ण सापडले होते, २०२२ मध्ये अवघे १८ रुग्ण सापडले. मात्र त्यानंतर २०२३ मध्ये रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. २०२३ मध्ये २५० रुग्ण, २०२४ मध्ये ही वाढ तिपटीने वाढून ७४३ रुग्ण इतकी झाली. २०२५ मध्ये ७९२ रुग्ण आढळले. जुलै २०२६ पर्यंत ३५ रुग्ण सापडले आहेत. डेंग्यू व चिकुनगुनियाला प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी त्यांना फारसे यश आलेले नाही.
लेप्टोचा प्रादुर्भाव रोखण्यात यश
पावसाळ्यामध्ये साचलेल्या पाण्यातून चालल्याने लेप्टोची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे या कालावधीत उंदरांना पकडण्यापासून साचलेल्या पाण्याचा निचरा जलदगतीने करण्यासाठी मुंबई महानगरपालिका विशेष प्रयत्न करत असते. मुबंई
महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार २०२१ मध्ये लेप्टोचे २२४ रुग्ण तर, २०२२ मध्ये २८६ रुग्ण सापडले होते. मात्र २०२३ मध्ये रुग्णसंख्या १ हजार ३८३ इतकी झाली. मात्र त्यानंतर २०२४ मध्ये ७९० रुग्ण आढळले. २०२५ मध्ये ७५० आणि जुलै २०२६ पर्यंत २२४ रुग्ण सापडले आहेत.
