मुंबई : पावसाळा सुरू होताच साथीच्या आजारांमध्ये दरवर्षी वाढ होते. यंदा पाऊस काहीसा विलंबाने सुरू झाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हिवताप व डेंग्यूच्या आजारांनी डोके वर काढले आहे. मुंबईमध्ये मागील १५ दिवसांत हिवतापाचे २८७ रुग्ण, तर डेंग्यूचे १७७ रुग्ण सापडले आहेत. गतवर्षी जुलैच्या १५ दिवसांत सापडलेल्या हिवतापाच्या रुग्णांच्या तुलनेत यंदा कमी रुग्ण सापडले असले तरी डेंग्यूच्या रुग्णांमध्ये काहीशी वाढ झाली आहे.

यंदा तब्बल एक महिना विलंबाने पाऊस सुरू झाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग आठवडाभर झालेल्या पावसानंतर मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मात्र या कालावधीमध्ये मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू व अतिसाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईमध्ये मागील १५ दिवसांमध्ये हिवतापाचे २८७, तर डेंग्यूचे १७७ रुग्ण सापडले आहेत. गतवर्षीच्या जुलैच्या १५ दिवसांमध्ये सापडलेल्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत यंदा हिवतापाचे फारच कमी रुग्ण आढळले असून, डेंग्यूच्या तुलनेत मात्र काहीशी वाढ नोंदवली आहे. गतवर्षी १५ जुलैपर्यंत हिवतापाचे ६३३ रुग्ण, तर डेंग्यूचे १०५ रुग्ण सापडले हाेते.

बांधकामाच्या ठिकाणी ३७ हिवतापाचे रुग्ण

बांधकामाच्या ठिकाणी साचणाऱ्या पाण्यामुळे मुंबईमध्ये दरवर्षी बांधकाम कामगारांना हिवताप, डेंग्यूची लागण होण्याचे प्रमाण अधिक असते. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जून आणि जुलैमध्ये विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत मुंबईतील तीन हजार बांधकाम साईट्ची तपासणी करून ५४ हजार ७६३ मजुरांचे रक्तनमुने गोळा करण्यात आले, यामध्ये ३७ रुग्णांना हिवतापाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

१० लाखांपेक्षा अधिक घरांचे सर्वेक्षण मुंबईमध्ये १ जून ते १४ जुलै या कालावधीत मुंबई महानगरपालिकेने १० लाख ६९ हजार ४२३ घरांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये ३६ लाख २९ हजार ६६३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. सुमारे १ लाख रक्तनमुने संकलित करण्यात आले. आरोग्य शिबिरांद्वारे १६ शिबिरे आयोजित करण्यात आली, तर ४ हजार ८३८ कार्यालयीन ठिकाणांची तपासणी करण्यात आली. लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधक औषधे १० हजार १७२ नागरिकांना देण्यात आली.

डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट वेक्टर नियंत्रण मोहिमेअंतर्गत ४९ हजार ५११ हिवताप डासांच्या प्रजननस्थळांची तपासणी करण्यात आली असून ५ हजार ३४२ ॲनोफिलीस डासांची उत्पत्तीस्थळे आढळली. डेंग्यू नियंत्रणासाठी २२ हजार ४१ एडीस डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात आली. तसेच ६६ हजार ५५५ टायर व अडगळीतील पाणी साचणाऱ्या वस्तू हटविण्यात आल्या. फॉगिंग मोहिमेद्वारे ५१ हजा ९३७ इमारतींच्या परिसरात आणि ७ लाख १४ हजार ४५८ झोपड्यांमध्ये धूरफवारणी करण्यात आली.

जवळच्या महानगरपालिका रुग्णालयात जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना घरात व परिसरात पाणी साचू देऊ नये, जुने टायर, डबे, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच डास प्रतिबंधक औषधांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. साचलेल्या पाण्यातून चालणे टाळावे, आवश्यक असल्यास गमबूट वापरावेत आणि ताप, अंगदुखी, डोकेदुखी किंवा इतर लक्षणे दिसल्यास स्वतः औषधोपचार न करता तातडीने जवळच्या महानगरपालिका आरोग्य केंद्र, दवाखाना किंवा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.